चिपळूण : भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात ४ व ५ जानेवारी रोजी वालावलकर रुग्णालयात हातांच्या अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
वालावलकर रुग्णालयात इंग्लंड येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. रघुनंदन कानविंदे हे रुग्णावर उपचार करणार आहेत. डॉ. कानविंदे हे इंग्लंड येथील बंगर युनिव्हर्सिटीमध्ये गेली तीस वर्षे सेवा देत आहेत. आता मात्र ते कोकणवासीयांसाठी दर शुक्रवार ते रविवार डेरवण रुग्णालयात सेवा देणार आहेत. ज्या रुग्णांची हाताच्या संधी वातामुळे बोटे वाकडी झालेली आहेत, ज्यांच्या हाताच्या बोटातून मुंग्या येत आहेत, ज्या रुग्णांना हाताच्या हाडांना गाठी आहेत, ज्या रुग्णांच्या मनगटाला वेदना होत आहेत, ज्या रुग्णांना हाताच्या मनगटाची हाडे, तळव्याची हाडे, बोटांची हाडे यांना फ्रैक्चर झालेले आहे, ज्या रुग्णांना स्लिप फिंगर आहे अशा सर्व रुग्णांनी वालावलकर रुग्णालयातील ओपीडी विभागातील अस्थिरोग ओपीडी नंबर ४ मध्ये शस्त्रक्रिया शिबिरापूर्वी येऊन तपासणी करून घ्यावी.
शिबिरासाठी हातावरील शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अभिजीत वाहेगावकर उपस्थित राहणार आहेत. डॉ. वाहेगावकर यांनी मेयो क्लिनिक अमेरिका येथून हाताच्या शस्त्रक्रियेमध्ये फेलोशिप केलेली आहे. ते गेली १५ वर्षे पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत आहेत. ते महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम करीत आहेत. मुंबई येथील एम.जी. एम. मेडिकल कॉलेजचे ऑर्थोपेडिक प्रोफेसर व युनिट इन्चार्ज डॉ. अशोक घोडके देखील या शस्त्रक्रिया शिबिरास उपलब्ध आहेत. मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रशांत कांबळे हे सुद्धा शिबीरास उपस्थित राहणार आहेत.
कोकण विभागातील हाताचे अस्थिरोग असलेल्या रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 26/Dec/2024












