चिपळूण : कोयना अभयारण्यातून तळसर भागाच आलेला पट्टेरी वाघ आलेल्या म्हणजेच मळलेल्या वाटेनेचे परत जाण्याची शक्यता अधिक आहे. नागरिकांनी त्या वाघाला त्रास करू नये. तो मानवापासून दूर राहणारा प्राणी आहे. तो आल्या पावली निघून जाईल, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांनी दिली.
चिपळूण तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काही प्राण्यांवरही त्याने हल्ले केले आहेत. परिणामी, नागरिकांत भीतीचे वातावरण असताना आता तळसर परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने सर्वच जण बुचकळ्यात पडले आहेत. तळसरमधील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार येथील जंगलात झालेली शिकार वाघाने केली आहे. गावचे पोलिसपाटील महेंद्र कदम यांनी तसा दाखला दिला आहे. काही दिवसांपूर्वी कापसावर परिसरात गवा रेडा आला होता. तोही कळपातून भरकटलेला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही वन्यप्राण्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची सीमा गाठली असल्याने वनविभागाची यंत्रणा झाडून कामाला लागली आहे. या वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
बिबट्या पोट फाडतो…
वनविभागाने लावलेले कॅमेरे ट्रॅप वाघावर लक्ष ठेवून आहेत. बिबट्या जनावरांचे पोट फोडतो आणि वाघ जनावरांचा पाठीमागील भाग प्रथम खाण्यास सुरुवात करतो. तळसरमधील गुरांची शिकार आणि तेथील पंजांचे ठसे पाहता ही शिकार वाघाने केली आहे असे दिसते; परंतु वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये तो दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेलगत कोयना येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एस.टी.आर./टी. १ हा वाघ खाली उतरून तळसर व चिपळूण परिसरातील जंगलात संचार करीत असावा. तो गेल्यावर्षी आला होता, अशी स्थानिकांची माहिती आहे. नागरिकांनी अशा वेळी घाबरून जाऊ नये. वाघ किंवा बिबट्या दिसला तरी गदीं करु नये, गोंगाट करु नये. यामुळे हे प्राणी बिथरण्याची शक्यता असते. त्यातून अघटीत घडू शकते. अनेकदा नागरिकांच्या अतिउत्साहामुळे दुर्घटना घडलेल्या आहेत. वाघ कुठून आला आणि कुठे जाणार यावर वनविभाग लक्ष ठेवेलच. पण पट्टेरी वाघ हा मळलेल्या वाटेनेच परत जात असतो. भक्ष, पाणी आणि जंगलाच्या शोधात वाघ फिरत असतो. अनेकदा तो त्याला आवडलेल्या ठिकाणी राहतो.
हे करा…
बिबट्या हा अगदी कोंबडी, कुत्रे ते गाव आदी कुणाही प्राण्याची शिकार करतो. त्यामुळे नागरिकांनी असे पाळीव प्राणी रात्री बंदिस्त ठिकाणी ठेवावेत. रात्री शेतात जाऊ नये. जावे लागले तर सोबत ट्रान्झिस्टर, टॉर्च असावी. आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. उघड्यावर शौचास जाऊ नये, अशा सूचना वनविभागाने केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 30/Dec/2024














