Maharashtra Health System : राज्यातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचं स्पष्ट करत, राज्यातील आरोग्य सेवेवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा ही सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पुरवली जाते.
मात्र 2016 ते 2022 या पाच वर्षांमध्ये राज्यातील आरोग्य सेवेत अनेक त्रुटी आढळल्याचं कॅग अहवालातून (CAG Report) उघडकीस आलं आहे. मनुष्यबळ, औषधं, उपकरणांची उपलब्धता आणि आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचं स्पष्ट करत राज्यातील आरोग्य सेवेवर कॅगने ताशेरे ओढले आहेत.
कॅगच्या अहवालातून कडक ताशेरे
2016 ते 2022 या कालावधीतील आरोग्य सेवेतील सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबतचा लेखापरीक्षणचा अहवाल ‘कॅग’मार्फत जाहीर करण्यात आला, या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राष्ट्रीय आयोग धोरण 2017 नुसार राज्याचे आरोग्य धोरण असणं अपेक्षित असताना, सरकारने अद्याप महाराष्ट्राचं आरोग्य धोरण बनवलंच नसल्याचं वास्तव अहवालातून समोर आलं आहे.
तज्ञ डाॅक्टरांची 42 टक्के पदे रिक्त
आरोग्य विभागात डाॅक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकिय कर्मचारी यांच्या मनुष्यबळातही कमालीची कमतरता आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, आरोग्य विभागाच्या अधिकार क्षेत्रातील तज्ञ डाॅक्टरांची 42 टक्के पदे रिक्त आहेत.
आरोग्य सेवा संस्थांच्या बांधकामांची 70 टक्के कामे अपूर्ण
अहवालात जानेवारी 2013 ते जून 2014 या कालावधीतील नवीन आरोग्य सेवा संस्थांच्या बांधकामांची 70 टक्के कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच अद्ययावतीकरणाची 90 टक्के कामे सप्टेंबर 2022 पर्यंत अपूर्ण होती. तसेच, 433 कामे जमिनीच्या अनुपलब्धतेमुळे सुरू करता आली नाहीत. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होताना दिसून आला आहे. 2015 मध्ये अमरावतीतील 31 कोटी खर्चून बांधलेले संदर्भ सेवा रुग्णालय (टप्पा 2) हे तीन वर्षापासून वापरा विना पडून असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
आग नियंत्रक यंत्रणा वेशीवर
रुग्णालयात आग लागण्याच्या घटना ताज्या असताना, कॅगने केलेल्या 50 टक्के केलेल्या रुग्णालयांच्या तपासणीत 36 रुग्णालयांनी अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रच घेतलेलं नाही. 22 रुग्णालयांनी धूर-शोधक यंत्र बसवलं नव्हतं. 20 रुग्णालयांनी आगीची सूचना देणारी यंत्रणाच बसवली नव्हती. 21 रुग्णालयांत आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीचा मार्गच दाखवण्यात आलेला नसल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 30-12-2024