‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; समुद्रकिनारीही पर्यटकांची मोठी गर्दी

रत्नागिरी : थर्टी फर्स्टच्या (Thirty First) पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली आहे.

जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

दरवर्षी नाताळची सुटी असल्याने थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणातील (Kokan Tourism) समुद्र किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले वळतात. यावर्षीदेखील पर्यटकांनी कोकणची निवड थर्टी फर्स्टसाठी केली आहे. मंडणगड तालुक्यातील वेळास, आंजर्ले, दापोली तालुक्यातील हर्णै, मुरूड, लाडघर, कर्दे, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, बुधल आदी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.

विशेषकरून पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील पर्यटकांनी येथील समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलला असून, या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या कारची वर्दळ आहे. आता नाताळची सुटी सुरू झाली आहे. या बरोबरच शनिवार, रविवार जोडून पुढे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी कोकण फुलले आहे. गुहागर, दापोलीकडे येणारे पर्यटक चिपळूणला येतात. येथे जेवण करून पुढचा प्रवास करतात. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय तेजीत आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनादेखील सुरू केल्या आहेत. विशेषकरून मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पर्यटकांनी उत्तर रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांना मोठी पसंती दिली आहे. स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे, गुलाबी थंडीचा गारवा त्या बरोबरच माशांची फक्कड चव घेत पर्यटक येथे आस्वाद घेत आहेत. कोकणी जेवणावर देखील अनेक ठिकाणी ताव मारला जात आहे.

माशांचा भाव वाढला

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अनेकजण गोव्याला पसंती देतात. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले वळत आहेत. विशेषकरून या ठिकाणी मिळणारे मासे आणि स्वच्छ-सुंदर किनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. यामुळे माशांचा भाव वधारला आहे. स्थानिक बाजारपेठेत अनेक प्रकारचे मासे सध्या उपलब्ध होत नाहीत. मात्र, पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्समध्ये हे मासे उपलब्ध होत आहेत. या शिवाय गोव्यातील उद्योजकांनी या जिल्ह्यात मिळणारे मासे चढ्या दराने आधीपासूनच नेले आहेत. त्यामुळे माशांचा भाव वधारला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 31-12-2024