रत्नागिरी : नागरिकांना बाजारात चालायला जागा नाही, जागोजागी टपऱ्या फळवाले, यामुळे होणारी वाहतूक कोंडी, आरक्षित वाहनतळ देखील फेरीवाल्यांनी अडवलेले हि परिस्थिती आहे सध्या रत्नागिरी शहराची. शहराच्या प्रत्येक फुटपाथवर सध्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसतंय. सर्वसामान्य नागरिकांना त्रास तर होतच आहे शिवाय दिवसेंदिवस शहर देखील गचाळ होत चाललंय. मंत्री उदय सामंत यांनी या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यावर देखील कारवाई होत नाही. मग या अनधिकृत फेरीवाल्यांना वरदहस्त कुणाचा ? हा प्रश्न नागरिक विचारू लागलेत.
अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि टपऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवकांचे फोन येतात आणि हि कारवाई थांबवायला सांगतात. यामागे कोणते अर्थकारण तर नाही ना ? याचा शोध घेणे आवश्यक आहे. शहराच्या प्रत्येक रस्त्यावरील फुटपाथ आज फेरीवाले आणि टपऱ्यांनी अडवलेले दिसते. नागरिकांच्या तक्रारी आल्या कि चार दिवस कारवाई होते. शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या नाल्यावर पाऱ्याची आळी येथे स्लॅब टाकण्यात आला आहे. याठिकाणी बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांसाठी दुचाकी पार्किंग देखील करता येणे शक्य आहे. मात्र या ठिकाणी देखील दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असलेले दिसत आहे. याबाबत परिसरातील नागरिक देखील तक्रार करत आहेत.












