चिपळूण : विधानसभेची निवडणूक सोपी नव्हती. या निवडणुकीत अनेक अडचणींना मला सामोरे जावे लागले. माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला; परंतु तुम्ही सर्वांनी ज्या ताकदीने मला पाठिंबा दिला, माझ्यासाठी धावून आलात त्यामुळेच आमदार होण्याचे भाग्य मला लाभले, अशी कबुली देत आमदार शेखर निकम यांनी आभार मानले.
मुंबई-दादर येथील महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण सभागृह येथे रविवारी (ता. २९) आमदार शेखर निकम यांनी मुंबईस्थित चाकरमान्यांसाठी संवाद भेट कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, मुंबई येथील राजेंद्र सुर्वे, शंकर माटे, घडशी आदी उपस्थित होते.
आमदार निकम म्हणाले, यापुढे तुमच्यासोबतचा संवाद मर्यादित राहणार नाही. मी दर मंगळवारी मुंबईत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मंत्रालयासमोरील पक्षाच्या कार्यालयात आपली भेट होऊ शकते त्याशिवाय मुंबईच्या ज्या ज्या भागात चिपळूण-संगमेश्वरचे चाकरमानी वास्तव्यास आहेत तिथे भेट घेण्याचा प्रयत्न करेन. त्या द्वारे तुमच्या गावातील प्रश्न, अडीअडचणी, समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल. रविवार असूनही या कार्यक्रमाला चाकरमान्यांची तोबा गर्दी झाली होती. मुंबईच्या विविध भागातून हे चाकरमानी आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 01/Jan/2025













