कोकणातील ५१ हजार ९७७ विद्यार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ

रत्नागिरी : येत्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या कोकण बोर्डाच्या ५१ हजार ९७७ इतक्या परीक्षार्थीना चालू जानेवारी महिन्यात शाळा स्तरावर आणि फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षाकेंद्र स्तरावर कॉपी न करण्याची शपथ देण्यात येणार आहे.

शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासह संबंधित सर्व घटकांना परीक्षेची इत्यंभूत माहिती व्हावी, यासाठी विभागीय मंडळाने शाळा स्तरावर चालू वर्षी प्रथमतःच बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानिमित्ताने ४ जानेवारीपर्यंत शाळा स्तरावर बोर्ड परीक्षेचा जागर होत आहे. राज्य मंडळ पुणे यांच्या मार्फत बोर्ड परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेशी संबंधित सर्व मुद्यांची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली. एवढेच नव्हे तर कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त परीक्षा आयोजनासाठी कडक कारवाईच्या सूचना आणि गुणात्मक सुधारणेसाठी परीक्षेशी संबंधित आवश्यक माहिती व सर्व घटकांची मानसिकता बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोकण विभागात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात ६६७ माध्यमिक शाळांमधून तर २५१ उच्व माध्यमिक अशा एकूण ९१८ विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत. त्यातून इयत्ता दहावी करिता २७ हजार ४१० आणि इयत्ता बारावी करिता २४ हजार ५६७ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. असे एकूण ५१९७७ विद्यार्थी आहेत, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दहावीचे १८४११ तर सिंधुदुर्गातील ८९९९ तर बारावीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १६०६५ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५०२ अशी विद्यार्थी असणार आहेत.

शाळास्तरावर घ्यावयाच्या बैठकीसाठी विभागीय मंडळाने आवश्यक माहितीची पीपीटी आणि शासन निर्णय परिपत्रकांची रसदच शाळांना पुरवली आहे. तसेच १८ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे शाळा प्रमुखांना विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

शिवाय बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीच्या शिक्षासूचीचे, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्टामागील सूचनांचे वाचन, तसेच मंडळाने सुचविलेल्या नमुन्यात ‘परीक्षेत गैरमार्ग करणार नाही’ अशा आशयाची शपथ प्रतिज्ञा शाळा प्रमुखांनी शाळास्तरावर देण्याबाबत सूचना आहेत. राज्य मंडळ व विभागीय मंडळाकडे असलेल्या सुविधा व योजनांची माहिती देण्याचेही निर्देश आहेत.

तसेच लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्र संचालकांनी परीक्षाकेंद्र स्तरावर शपथ देणे, शाळा प्रमुखांनी चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहिती, संकेतांक नुतनीकरण शुल्कासह प्रस्ताव यांची पुर्तता करावी. नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहितीची पुर्तता मुदतीत प्राप्त न झाल्यास परीक्षाच्यांची प्रवेशपत्रे अशा शाळांना उपलब्ध होणार नाहीत. त्याची जबाबदारी संबंधित शाळाप्रमुखांवर निश्चित होईल. त्यामुळे होणा-या विद्यार्थांच्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शाळा प्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे.

कॉपीमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासह परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा स्तरावर प्रबोधन आवश्यक आहे, अन्यथा दुसऱ्या टप्प्यात कारवाई करणे अटळ आहे. सुभाष चौगुले, विभागीय सचिव, कोकण बोर्ड,

अशी असेल प्रतिज्ञा…
मी…. या शाळेचा/ची कनिष्ठ महाविद्यालयाचा/ची विद्यार्थी/विद्यार्थिनी आजच्या दिवशी अशी शपथ घेतो/घेते की, मी फेब्रुवारी-मार्च२०२५ च्या इयत्ता दहावी/बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. सातत्याने अभ्यास करेन. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन, परीक्षेस मोठ्या आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावविरहित सामोरे जाईन, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे/कनिष्ठ महाविद्यालयाचे, गुरुजनांचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करेन.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 01/Jan/2025