राजापूर : गोखले कन्या शाळेच्या ज्या काही अत्यावश्यक गरजा आहेत. त्या आपण पुर्ण करूच परंतु या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावलेला असल्याने या शाळेचा रत्नागिरीतील खेडशी शाळेच्या धर्तीवर स्मार्ट स्कूल म्हणून विकास करण्याचे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले. तर त्या बाबतचा एक आराखडा करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले याना दिल्या.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शहरातील जि. प. गोखले कन्याशाळेने प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार श्री. सामंत यांनी मंगळवारी शाळेला भेट देवून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. भटाळे व पालकांचे वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ यानी शाळेला संरक्षण भिंत, सोलर पॅनेल, कंपाऊड वॉल, शाळेच्या काही भौतिक गरजा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली. त्यावर बोलताना आमदार किरण सामंत यांनी शाळेच्या ज्या काही गरजा असतील त्या पुर्ण केल्या जातील. परंतु ही शाळा, शिक्षक आणि पालक मिळून चांगले काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात ही शाळा स्मार्ट स्कूल म्हणून तयार करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण शासन स्तरावरून करू असे आश्वासन आ. सामंत यांनी दिले. तर तसा आराखडा तयार करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले यांना त्यानी दिल्या.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले, शिवसेना विधानक्षेत्र प्रमुख राजू कुरूप, शहर प्रमुख सौरभ खडपे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कुडाळी, शिक्षण विभागाचे महेश हळदणकर तसेच सर्व सदस्य पालक, शिक्षकवृंद उपस्थीत होता.
यावेळी आमदार श्री. सामंत यांचा सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर राजाभाऊ रसाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भटाळे, शिक्षक श्री. सुहास काडगे व सहा. शिक्षकांचा आमदार सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर नासा व इतर शालाबाह्य परिक्षा आणि क्रीडास्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुरूवातीला मुख्याध्यापिका सौ. भडाळे यांनी शाळेच्या एकुण प्रगतीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन व आभार पदवीधर शिक्षक सुहास काडगे यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:26 PM 01/Jan/2025














