चिपळूण : परशुराम घाटात ‘गॅबियन भिंती’ चा पर्याय ?

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात महामार्ग विभागाकडून घाटात संरक्षणाच्यादृष्टीने धोकादायक वाटत असलेल्या भिंती पाहून तेथे गॅबियन भिंती उभारण्यासह विविध पर्यायावर नियोजन सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या खालील भागात रॉक टेस्टिंगला सुरवात करण्यात आली.

या भागात सातत्याने अपघात घडत आहेत. दरडी कोसळण्याच्या ठिकाणी अद्याप कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. उपाययोजनेचा पत्ता नसताना वाहनचालकांच्या माहितीसाठी घाटात धोक्याची माहिती देणारे फलक राष्ट्रीय महामार्गचा महाड विभागाने लावले आहेत. घाटात फलकबाजी करून उपाययोजनांच्यादृष्टीने ठोस कार्यवाही मात्र शून्य असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या कालावधीत परशुराम घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यावर्षी देखील पावसाळ्याच्या सुरवातीलाच घाटात संरक्षक भिंतीसह मातीचा भराव वाहून गेल्याच्या घटना घडल्या. पावसाळ्यात हा घाट सर्वासाठी डोकेदुखी बनला. संरक्षक भिंती कोसळलेल्या ठिकाणी मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली आहे. घाटात चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही वाहतूक मात्र नेहमीच विस्कळीत राहिली आहे. परिणामी, गेल्या दीड-दोन महिन्यांत घाटात अपघातातील संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत लहान-मोठे दहा अपघात झाले आहेत. यातील काहींनी नोंद झाली तर काहींनी केलेली नाही. नवीन वर्षाच्या स्वागतालाही अपघाती मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्याच्यादृष्टीने कोणतीही कार्यवाही होत नसल्याने सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 02/Jan/2025