गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे रखडलेले कामे ४५ दिवसांत पूर्ण करून देण्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हमीपत्र देण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेले हमीपत्र व अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायत वरवेली व ग्रामस्थांचे साखळी उपोषण समाप्त करण्यात आले.
गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजनेच्या अपूर्ण कामामुळे वारंवार ग्रा.पं मार्फत पाठपुरावा करून सुद्धा कामे पूर्ण होण्याबाबत कोणतीच कार्यवाही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व मक्तेदाराकडून झालेली नाही. याबाबत गुहागर पंचायत समिती यांना वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. परंतु प्रशासनाकडूनही कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप झालेली नाही. नळपाणी योजनेचे मक्तेदार मे. भिवाई कन्स्ट्रक्शन या ठेकेदारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नळपाणी योजनेचे शिल्लक कामे त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर मौजे वरवेली ग्रामस्थ व ग्रामपंचायत वरवेली यांच्यावतीने बुधवारी सकाळपासून साखळी उपोषण करण्यात आले.

या उपोषणात उपसरपंच मृणाल विचारे, ग्रा. पं. सदस्य संदीप पवार, अरुण रावणंग, नरेश रांजाणे, सेजल शिंदे, श्रावणी शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जगनाथ शिंदे, पोलिस पाटील सुजित शिंदे आदींसह ग्रामस्थांचा सहभाग होता.
उपोषणस्थळी भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, युवा सेनेचे अमरदीप परचुरे, शहर प्रमुख नीलेश मोरे आर्दीनी भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.
शिल्लक असलेल्या कामासंदर्भात शासन स्तरावरून त्वरित दखल घेण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मंदार छात्रे यांनी ग्रामपंचायतीने मागणीचे पत्रानुसार, जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनेत नवीन विहीर बांधणे हे काम सोडून सर्व शिल्लक असलेली कामे ४५ दिवसांत पूर्ण करून देण्याचे हमीपत्र दिले. यानंतर हे उपोषण ग्रामस्थांकडून थांबविण्यात आले.
१५ महिने उलटूनही काम अर्धवट
मंजूर नळपाणी योजना (अंदाजपत्रकिय रक्कम १,९२,३८,४३२) कामाचे मक्तेदार भिवाई कन्स्ट्रक्शन ता. माण, जि. सातारा यांना दि. २३ मार्च २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, १५ महिने उलटूनही काम अर्धवट स्थितीत ठेवलेले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेण्यात आल्याने अखेर वरवेली ग्रा.पं. कमिटी व ग्रामस्थांकडून गुहागर पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 03/Jan/2025














