शेतजमीन सुपीक करणारे जीवाणू शोधण्यात आयआयटी मुंबईच्या संशोधकांना यश

मुंबई : अधिकाधिक उत्पादन मिळविण्याच्या हव्यासापोटी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशके, खतांचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतजमिनी नापिक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रासायनिक घटक नष्ट करून शेतजमीन पुन्हा सुपीक करणारे जीवाणू शोधण्यात आयआयटी मुंबईच्या संशोधकांना यश आले आहे.

हे जीवाणू मातीतील विषारी घटक सेवन करून उपयुक्त पोषक तत्त्वे उपउत्पादनाच्या स्वरूपात तयार करतात, अशी माहिती संशोधकांनी दिली. आयआयटी मुंबईतील जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रशांत फळे यांच्या मार्गदर्शनात संदेश पापडे यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. संशोधकांनी प्रदूषित शेतजमिनीतील शोधलेल्या जीवाणूंपैकी ‘स्युडोमोनास’ आणि ‘एझिनेटोबॅक्टर’ हे जीवाणू अरोमॅटिक संयुगांचे विघटन चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे प्रदूषित रासायनिक घटक शेतजमिनीपासून वेगळे करून त्याचे विघटन निरुपद्रवी घटकात करतात. त्यातून उपउत्पादक घटक म्हणून लायटिक एन्झाइम आणि हायड्रोजन सायनाइडसारखे पदार्थ तयार करतात. त्याचा उपयोग वनस्पतींचे नैसर्गिक संरक्षक प्रणाली म्हणूनही काम करतात. पर्यावरणपूरक असलेल्या या जीवाणूंचे मिश्रणांचा शेतजमिनीत वापर केल्यास पिकांची उत्तम वाढ तर होतेच, शिवाय उत्पन्नही ४५ ते ५० टक्क्यांनी वाढत असल्याचे प्रा. प्रशांत फळे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष वापरासाठी प्रतीक्षा
या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आहेत. सध्याचे संशोधन हे प्राथमिक पातळीवर असून जीवाणूंच्या आणखी चाचण्या कराव्या लागणार आहे. याबाबतचे तंत्रज्ञान आणखी विकसित झाल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर करता येईल, अशी माहिती फळे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 03/Jan/2025