रत्नागिरी : Election strategy | विधानसभा निवडणूक नुकतीच झाली. मंत्रिमंडळ स्थापनसुद्धा झाले. राजकीय पटलावर उमेदवारांना पडलेल्या मतांची गोळाबेरीज सुरु असतानाच इच्छुक उमेदवारांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी 3 महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असे सुतोवाच केले. यामुळे इच्छुकांनी व्यूहरचना सुरु केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर मार्चच्या आसपास निवडणुका लागतील ही शक्यता गृहित धरून इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागले आहेत. काहींनी तर व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली स्थानिक पातळीवर नेतेमंडळींमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यातील बहुतांश महापालिका व नगरपालिकांचा कार्यकाल डिसेंबर 2021 मध्ये संपुष्टात आला. यानंतर निवडणूक आयोगाकडून मुदत संपलेल्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, ओबीसी आरक्षण, राज्यातील सत्ता परिवर्तन यासह विविध कारणांनी हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. यानंतर मार्च 2022 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकालही पूर्णत्वास आला. निवडणूक न झाल्याने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासकीय राजवटीत सुरू आहे.
जिल्हा परिषदेचे 62 गट तर पंचायत समितीचे 124 गण आहेत. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणूकही नुकतीच झाली. या निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जय पराजय विसरून सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नवीन वर्षांत निवडणूक प्रक्रियेतील न्यायप्रविष्ठ निकाल लागून निवडणूक जाहीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पुनर्रचनेत वाढले सात गट
जिल्हा परिषदेच्या पुनर्रचनेत सात गट वाढले आहेत. पूर्वी 55 गट होते त्यामध्ये आता 7 ने भर होऊन 62 वर झाली आहे. तर पंचायत समितीचे 110 गणावरुन 114 गण झाले आहेत. यामुळे यंदा अधिक चुरस होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 04-01-2025












