रत्नागिरी : लांजा राजापूर मतदारसंघातून झालेला पराभव जिव्हारी लागलेले राजन साळवी कमालीचे अस्वस्थ आहेत. भाजप मध्ये जाणाऱ्या वृत्ताचे कधी खंडन तर कायकर्ते यांची भूमिका विचारात घेऊन निर्णय घेणार अशी परस्परविरोधी विधाने मागील दोन दिवसात त्यांची समोर आली आहेत. आज त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली व त्यांच्याजवळ आपले म्हणणे मांडले. आपल्या पराभवाला पक्षातील काही वरिष्ठ जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी आजवर केले आहेत. मी नाराज आहे, आपल्या कार्यकर्त्यांना विचारून मी माझा निर्णय घेईन असे देखील त्यांनी सांगितले आहे. आता मात्र कार्यकर्त्यांनी राजन साळवी यांना दुसर्या पक्षात जाण्यासाठी हिरवा कंदील दिल्याचे दिसत आहे. या आशयाची पोस्टर सध्या साळवी यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर व्हायरल केली जाताना दिसत आहेत. तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही सांगाल ते धोरण असे पोस्टर कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर पोस्ट होताना दिसत आहेत. साहेब तुम्हीच आमचे चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष असे देखील या पोस्टर वर म्हटले आहे. येत्या १२ तारखेला भाजप चे शिर्डी येथे प्रदेश अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात येईल असे देखील बोलले जात आहे. याचवेळी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यामतून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.














