Maharashtra School uniform quality: शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला.. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

मुंबई : काही दिवसातच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता ‘ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाळेच्या गणवेशावरुन टीका केली आहे.

आमदार पवार यांनी एक व्हिडीओ सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केला, या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात शाळेतील गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन रोहित पवार यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री साहेब आठवतंय का ? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे.

“सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित क्विलीटी बघ” असं तुम्ही म्हणाला होतात, आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का ?, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

“असो गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच, असंही आमदार रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेशाची घोषणा केली, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत. या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. त्यासाठी शासनाच्या खरेदी धोरणानुसार निविदा प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. गणवेश किती चांगले दिले जात आहेत, हे सांगताना त्यांनी दोन गणवेश सभागृहात दाखविला होता. दरम्यान, आता या गणवेशावरुन राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 30-09-2024