कडवई : संगमेश्वर तालुक्यातील माखजन कासे असावे नारडुवे गावाकडे नियमित येणारी देवरुख आगाराची एसटी बस बंद केल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित राहतील की, काय, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून हि बस फेरी बंद असून याचा फटका प्रवाशांना बसत आहे. सकाळी सात वाजता ही बस देवरुखमधून माखजन नारडुवेकडे मार्गस्थ होते. तेथून परत ८ वाजून ४५ मी. माखजन सरंद हायस्कूल मार्गे पुढे आरवलीकडे जाते. यामुळे शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशी वर्गाला ही बस सोयीची होते. तसेच येथील ग्रामस्थ बँक आठवडा बाजार, पोस्ट ऑफिस, दवाखाना व कामासाठी येत असतात. मात्र सध्या देवरुख एसटी डेपोच्या विस्कळीत व भोंगळ कारभाराचा फटका या सर्वसामान्यांना बसत आहे. हा परिसर खाडीपट्ट्यातील दुर्गम व डोंगराळ भाग आहे. या ठिकाणाचे अनेक विद्यार्थी डोंगर माथ्यावरून मोठी पायपीट करून येतात. या मार्गावर अनेकदा जंगली प्राणी फिरत असतात. काही अघटित घडल्यास त्यास एसटी प्रशासन जबाबदार राहील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 10/Jan/2025













