साडवली येथील रोहन धने ने तयार केलेल्या गांडुळ खताला मोठी मागणी

देवरुख : फळबाग व फुलबाग यांना नव संजीवनी देण्याचे काम गांडूळ खत करते. यामुळे जमीन सुपीक होऊन झाडांना देखील फळधारणा चांगली होते. अशा गांडूळ खताची निर्मिती करण्याचे काम नजीकच्या साडवली येथील रोहन सुरेश धने करीत आहे. त्याच्या या उपक्रमाने शेतकऱ्यांनाही चैतन्य मिळाले आहे.

रोहनने डॉ. तानाजीराव चोरगे कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथे ४ वर्षांपूर्वी बीएस्सी अॅग्रीकल्चर ही पदवी मिळवली आहे. कृषी विषयक शिक्षण घेत असताना जमिनीचा पोत सुधारून फळबाग वृक्षांचे संगोपन केले. त्यामुळे त्यातून चांगली फळधारणा होते. याचे शास्त्रोक्त शिक्षण त्याने घेतले आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहनने आपल्या साडवली येथील दीड एकर कातळावर काजू लागवड केली. ही काजूची रोपे चांगली तरतरीत व्हावीत अन चांगली फलधारणा व्हावी, यासाठी त्याने गांडूळ खत निर्मिती केली. या खताचा उपयोग काजू बागेमध्ये केला. याचबरोबर जीवामृत, गोमूत्र याचा वापर करून काजूची बाग फुलवली.

संगमेश्वर तालुक्यात सध्या काजू बागांमध्ये झाडांना मोहरच दिसून येत आहे. असे असतानाही रोहनच्या बागेमध्ये असलेल्या झाडांना फळे लागली आहेत.

गांडूळ खताची मागणी मोठ्या प्रमाणात असताना स्थानिक स्तरावर गांडूळ खत उपलब्ध होत नाही. ही खंत रोहनने मनामध्ये घेत. काजू बागेमध्ये असलेल्या इमारतीमध्ये गांडूळ खताचे बेड तयार केले आहेत. बारा फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट उंचीचे १८ बेड केले आहेत. ‘एशिनीया टेटिफेडा’ जातीचे गांडूळ बीज आणून या बेडमध्ये सोडले आहेत. गुरांच्या शेणाचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी रोहन करतो. परिसरातील पालापाचोळाचाही वापर करण्यात येतो. गांडूळ खताच्या वापरामुळे बागेला आवश्यक सूक्ष्म मूलद्रव्य मिळतात. नत्र, स्फुरत पालात्र व गांडूळ सोडत असलेल्या अंगावरील द्रव्य यामुळे संपूर्ण जमीन सुपीक होते. जमिनीचा पोत वाढतो, जमीन भुसभुशीत होऊन सुपीक होते.

शेतकऱ्यांकडून गांडूळ खताला मोठी मागणी आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त खत निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी खत निर्मितीची इमारत वाढवण्याचे काम सुरू आहे. – रोहन धने

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 10/Jan/2025