संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वर देवरूख मार्गे कोल्हापूरकडे जाणल्या राज्यमार्गाची पावसाळ्यात दुरवस्था झाली होती. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, अपघातही घडत आहेत. याबाबत वाहनचालक आणि प्रवाशांनी सतत ओरड केल्यानंतर या मार्गांची काही प्रमाणात डागडुजी झाली; मात्र पावसाळा संपताच खासगी कंपन्यांनी इंटरनेट केबल टाकण्यासाठी या रस्त्याची खोदाई सुरू केली आहे. त्यात रस्त्यालगतचे गाईड स्टोनही उखडून टाकण्यात आले आहेत.
देवरूख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कोसुंब परिसरात रस्त्याच्या साईडपट्टीची खोदाई सुरू असून, सर्व गाईडस्टोन उखडून टाकण्यात आले आहेत. संगमेश्वर-देवरूख मार्गावर अनेक ठिकाणी खासगी कंपनीकडून इंटरनेटची केबल टाकण्यासाठी खोदाई केली जात आहे. याबाबत राज्यमार्गावरील गावात असणाऱ्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले गेले नसल्याने अथवा त्यांच्याकडून कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याने काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाईप तुटले आहेत. लोवले, बुरंबी, करंबेळे, कोसुंब आदी गावातून केबल टाकण्यासाठी खोदलेले मोठे चर व्यवस्थित न बुजवल्याने आता धोकादायक बनले आहेत. संगमेश्वर ते साखरपादरम्यान रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी मातीचे ढीग टाकून ठेवण्यात आले आहेत.
धुळीचा त्रास वाहनचालकांना
रस्त्यावरील खोदलेले चर बुजवताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे रस्त्यावर राहणारी माती वाहने गेल्यानंतर धुळीच्या रूपात घरांमध्ये आणि दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात आहे. याबाबत वाहनचालकांसह स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 11/Jan/2025














