रत्नागिरी : कोकणातून नामशेष होणाऱ्या लांबड्या काळ्या तिळावर कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने संशोधन करून काळ्या तिळावर संशोधन पूर्ण झाले आहे.
१०३ वर्ष कार्यरत असलेल्या शिरगाव संशोधन केंद्रातून काळ्या तिळावर हा पहिलाच प्रयोग आहे. पाच जिल्ह्यात याची चाचणी पूर्ण झाली असून, यावर्षी शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
तीन वर्षापूर्वी कोकणात नामशेष होणारे लांबडे काळे तीळ यावर संशोधन केंद्रातून संशोधन सुरू होते. कृषिखाते, कृषी विज्ञान केंद्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये या काळ्या तिळावर शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी घेण्यात आली. लांबड्या काळ्या तिळाचे तपासणीसाठी प्रयोग घेण्यात आले. यावर्षी ही जात शेतकऱ्यांसाठी प्रसारित होण्याची शक्यता आहे.
कोकणात पूर्वीपासून ही काळ्या लांब तिळाची जात होती; पण त्यावर उत्पादन कमी झाले. त्यामुळे घरगुती जुने घाणेही बंद पडले. शेतकरी काळ्या तिळाचे उत्पादन कमी झाल्यामुळे स्वच्छ तेलही काळाच्या पडद्याआड झाले. काळे तीळ ही जात नामशेष होऊ नये यासाठी संशोधन केंद्राने कंबर कसली. शेतकऱ्यांकडून काळ्या तिळाची जात मिळवून त्यातील निवडक तिळावर केंद्रातून संशोधन करण्यात आले. पाच जिल्ह्यात घेण्यात आलेल्या चाचणीतून ५०० किलोच्या आसपास उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
माकडांचा त्रास नाही
जिल्ह्यात माकडाच्या उपद्रवाशी शेतकरी झुंजत आहे. त्यावर कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी वरकस शेती करणे सोडले आहे. त्यामुळे दुर्लक्षित पिकांकडे शेतकऱ्यांकडून उत्पादन होत नाही; मात्र या काळ्या तिळाचे डोंगरउतारावर व मध्यम रेवटाळ अथवा वरकस जमिनीत उत्पादन केल्यास माकडांचा त्रास होत नाही. काळ्या तिळाकडे माकड ढुंकूनही पाहात नाही. त्यामुळे काळ्या तिळाची शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
तिळावर संशोधन केलेली पहिलीच जात
कृषी संशोधन केद्राने विकसित केलेल्या या काळ्या तिळाच्या नवीन जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४० ते ४२ टक्के असणार आहे. ही जात ९० ते १०० दिवसात तयार होईल. तेल खाद्यासाठी आणि औषधांसाठीही वापरात येणार आहे. पूर्वी याची पेंड ही जनावरांना खाण्यासाठी देत होते. काळ्या तिळाची संशोधन केलेली पहिलीच जात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
भारत सरकार ऑईल सेसमध्ये खायचे तेल आयात करतो. भारतात भूईमुग, सोयाबीन यांचे तेल बाजारात मिळते; पण दुर्लक्षित पारंपरिक पीक काळे तीळ यावर लक्ष देण्याची गरज होते. या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कोकण कृषी विद्यापिठांतर्गत येथील कृषी संशोधन केंद्रातर्फे यावर संशोधन करण्यात आले. पाच जिल्ह्यात याची चाचणी घेण्यात आली. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतील या नवीन काळ्या तिळाची शेती केल्यास उत्पादन वाढ होईल. – डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव-रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 11-01-2025














