राजापूर : राजापूर, लांजा तालुका नागरिक संघ आणि वाटूळ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वाटूळ येथे पुढील महिन्यात दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहीत्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला (ता. ३१) वाटूळ गावच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे पूजन होणार आहे. या नदीपूजनाच्या अनोख्या कार्यक्रमासाठी संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल बुवा मोरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल बुवा मोरे यांची राजापूर, लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी नुकतीच देहू येथे जाऊन भेट घेतली. यावेळी अमोल बुवा मोरे यांच्याशी संवाद साधून या साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याचा आग्रह केला. त्यांनी ही विनंती मान्य करून साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन श्री. लाड यांनी ग्रामीण भागातील साहित्यीकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजापूर-लांजा नागरीक संघातर्फे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. तालुक्यातील वाटूळ येथे दहावे साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. १ आणि २ फेब्रुवारी या कालावधीत हे साहित्य संमेलन होणार आहे. मुचकुंदी नदीचे पूजन करण्याचा अनोखा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल बुवा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या नदी जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर संमेलनस्थळी प्रवचन, हरिपाठ आणि किर्तनाचा कार्यक्रम असल्याने वाटूळ गावाची वारकरी परंपराही या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक आणि साहित्यप्रेमींसह साऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे.
१३० वर्षांची वारकरी परंपरा
वाटूळ गावाला सुमारे १३० वर्षाची वारकरी परंपरा असून, या गावातील वारकरी मंडळी प्रतिवर्षी कार्तिकवारी करीत असतात, या गावच्या तांबळवाडीत गेली अनेक वर्षे संत तुकाराम बीजचा मोठा उत्सव होत असतो. त्या संत तुकाराम महाराजांचे थेट बारावे वंशज गावात येत असल्याने वारकऱ्यांसह ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 13/Jan/2025














