रत्नागिरी : एसटी चालवताना गाडीत प्रथमोपचार पेटी आहे का, टूल कीट आहे का? त्याची तपासणी करावी, बसचालकांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे यांनी केले.
माळनाका येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांवर पूर्वी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत;परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे आता असे गुन्हे दाखल होणार नाहीत, असेही ते म्हणाले, यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधीक्षक राजेश पाथरे, रत्नागिरी आगार व्यवस्थापक संदीप पाटील, आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) बालाजी अडसूळ उपस्थित होते.
अपघात टाळण्याविषयी माहिती
मोटारवाहन निरीक्षक आनंद शिंदे यांनी आदर्श चालक तयार करणे, रस्ता सुरक्षेची गरज, प्रवास सुरू करण्यापूर्वी वाहनाची माहिती घेणे, वाहतुकीचे नियम, देशात किती टक्के अपघात होत आहेत, कोणकोणत्या प्रकारातील अपघात होत आहेत, अपघात घडल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, महामार्ग मदत केंद्र, वाहन ब्रेकडाऊन झाल्यास घ्यावयाची काळजी आदी विविध विषयांवर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करून सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 13/Jan/2025













