स्वामी विवेकानंदांच्या ‘त्या’ भाषणानं इतिहास घडवला : राजेश आयरे

रत्नागिरी : स्वामी विवेकानंदांनी शिकागो (अमेरिका) येथे जागतिक सर्वधर्म परिषदेत भारताचा जाज्वल्य धार्मिक इतिहास सांगितला. प्राचीन हिंदू धर्म साऱ्या जगाकडे कोणत्या नजरेनं पाहतो, ते सांगणारं असं ते भाषण होतं. विवेकानंदांच्या त्या भाषणानं इतिहास घडवला, असे प्रतिपादन सोमेश्वर शांतिपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे यांनी केले.

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवादिनानिमित्ताने अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महा‌विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एनएसएस स्वयंसेवकांसाठी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयावर ते बोलत होते. भारताची ओळख जगाला करून देण्यामध्ये विवेकानंदांचे योगदान मोलाचे आहे, हे विद्यार्थ्यांना सांगितले.

आयरे यांनी स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण चरित्र मुलांसमोर उलगडून सांगत असताना स्वामींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे वर्णन केले.

मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर उपस्थित होते. प्रा. केळकर यांनी स्वामी विवेकानंदांचा साधेपणा समजून सांगण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगितला व भारतीय अध्यात्माची ताकद किती आहे, याचे वर्णन केले. मान्यवरांचा परिचय निधी घाडी, गौरी सावंतने सूत्रसंचालन केले. हिंदवी कीरने आभार मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजित भिडे, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. स्नेहा बाणे व सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 14/Jan/2025