रत्नागिरी : महाभारतातील कथा नाट्यमयतेमुळे अतिरंजित करून रंगवल्या जातात, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांनी केले. रत्नागिरीत सुरू असलेल्या चौदाव्या कीर्तनसंध्या महोत्सवात महाभारतावर ते बोलत होते. ते म्हणाले की, पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रात महाभारताच्या दोन मूळ प्रती उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केल्यानंतर अनेक कथांचा उलगडा होतो. त्यातच वस्त्रहरणाची कथा आहे. राजसूय यज्ञामुळे कौरव चिडले होते. वास्तविक मयसभेच्या वेळी द्रौपदी तेथे उपस्थित नव्हती.
त्यामुळे ती त्यांना हसलीच नव्हती. तरीही द्रौपदी आपल्याला हसल्याचे दुर्योधनाने आपल्या वडिलांना खोटे सांगून त्यांना पांडवांच्या विरुद्ध बेबनाव रचायला उद्युक्त केले. त्यांनी पांडवांना द्युतामध्ये हरवले. त्याचा सगळा दोष कौरवांना देण्यापेक्षा पांडवांनीही द्युत खेळायला नकार द्यायला हवा होता. त्यांच्या हातात अधिकार होते. कारण ते तेव्हा सत्तारूढ होते. मात्र कित्येक वेळेला सजनांचा बेसावधपणा किंवा अतिआत्मविश्वास संकटांना जन्म घालतो. धर्मराज हरल्यानंतर द्रौपदीच्या अवमानाचा प्रसंग घडला. मात्र तिचे वस्त्रहरण झाले नाही. फक्त वस्त्र ओढण्याचा प्रयत्न झाला. कृष्णाच्या शक्तीमुळे वस्त्रहरणापासून तिची मुक्तता झाली. आपल्या घरातल्या किंवा कोणत्याही स्त्रीचा जे कोणी अपमान करेल, त्याचे कुळच नष्ट होते, असा याचा अर्थ आहे.
तिघांचा सत्कार
टिळक आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दीनिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे यांचा सन्मान करण्यात आला. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कीर्तनसंध्येच्या उपक्रमाची स्वतःहून दखल घेतली आणि सर्व सहकार्य करण्याची खात्री दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचाही सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 14/Jan/2025














