उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे यांचा ‘दि ग्रेट मराठा’ पुरस्काराने होणार सन्मान

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठा मंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून, या संमेलनात खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या असामान्य कार्याप्रती कृतज्ञता म्हणून ‘दि ग्रेट मराठा’ हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, अशी माहिती मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राकेश नलावडे, अप्पा देसाई, प्राची शिंदे उपस्थित होत्या.

याविषयी अधिक माहिती देताना श्री. सुर्वे म्हणाले, रत्नागिरी येथील महासंमेलन हे दोन दिवसांचे असून त्याचे उद्घाटन १८ रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपतींचे वंशज कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या हस्ते आणि खासदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच याप्रसंगी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील नवनिर्वाचित मराठा आमदार नीलेश राणे, शेखर निकम, भास्कर जाधव, निरंजन डावखरे, नूतन मंत्री नितेश राणे, योगेश कदम यांचा मराठा समाजातर्फे भव्य सत्कार केला जाणार आहे. या महासंमेलनासाठी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव व सारथीचे विद्यमान अध्यक्ष अजितराव निंबाळकर आणि कर्नाटक राज्याचे मुख्य सचिवपद भुषविलेले अविनाश जाधव हे दोन्ही मराठा समाजातील वरिष्ठ आयएस अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

या महासंमेलनात ज्या मराठा मान्यवरांनी त्यांच्या कार्यसिद्धीमुळे नाव कमावलेले आहे अशा नामवंतांचा फेडरेशनचे मानाचे पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

मराठ्यांच्या इतिहासाचे परदेशी साधने नव्याने अभ्यासून ज्यांनी संशोधन केले त्या वयोवृद्ध अशा डॉ. जयसिंगराव पवार यांना ‘अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच ‘अखिल मराठा समाज भूषण’ हा पुरस्कार इतिहासकार डॉ. इंद्रजीत सावंत, अणुशास्त्रज्ञ व गरिबासाठी नॅनो हाऊसिंगवर संशोधन करणारे डॉ. सुरेश हावरे यांना दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘सारथी’चे अध्यक्ष असलेले अजितराव निंबाळकर तसेच कर्नाटक राज्याचे चिफ सेक्रेटरी पद भूषविलेले अविनाश जाधव यांनाही ‘अखिल मराठा समाज भूषण’ हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे, तर उमेश भुजबळराव यांना ‘अखिल मराठा समाज गौरव’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अखिल मराठा फेडरेशन व मराठा बीझनेसमेन फोरमचे संस्थापक अध्यक्ष कै. शशिकांतजी उर्फ आप्पासाहेव पवार यांना या महासंमेलनात मराठा समाजातर्फे मरणोत्तर ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

दरम्यान, १८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता पहिले चर्चासत्र हे ‘इतिहासाच्या कोंदणातून वेध मराठ्यांच्या भविष्याचा’ या विषयावर होणार असून, दुसरे चर्चासत्र संध्याकाळी ५.३० वाजता ‘मराठा बिजनेसमेन फोरम मिशन उद्योग’ या विषयावर होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. १९ जानेवारीला सकाळी १० वाजता ‘आजची जिजाऊ’ या विषयावर महिलांसाठी, तर दुपारी १२ वाजता ‘अभियान उद्योजकतेचे’ या विषयावर चर्चासत्र होईल. या चारही सत्रांतून मराठा समाजाला तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

फेडरेशनने या दोन्ही दिवशी भोजनाची व न्याहारीची तसेच चहापाण्याचीही खास व्यवस्था केलेली आहे. तसेच या महासंमेलनाच्या निमित्ताने अखिल मराठा फेडरेशनच्या व सहआयोजक क्षत्रिय मराठा मंडळाच्या वेवसाईटचे उद्घाटन केले जाणार असून यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांचे हस्ते केले जाणार आहे.

या दोन दिवसांच्या अखिल मराठा महासंमेलनाला समस्त मराठा समाजाने उपस्थित राहावे आणि घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:54 PM 15/Jan/2025