रत्नागिरी : हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा पिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम झाल्याने तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
शिवाय पुनर्मोहर सुरू झाल्याने बागायतदार धास्तावले आहेत. खत व्यवस्थापनापासून आंबापीक बाजारात येईपर्यंत लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यातच नैसर्गिक संकटामुळे पीक धोक्यात येऊन बागायतदारांना याचा फटका बसत आहे.
सद्यस्थितीत कसे कराल आंबा पिकाचे व्यवस्थापन
- आंबा फळावरील फळमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन झाडाखाली व बुंध्याजवळील जमिन हिवाळ्यात १० ते १२ सेमी खोल नांगरुन घ्यावी. त्यामुळे फळमाशीचे सुप्त अवस्थेतील कोष नष्ट होऊन भविष्यातील प्रादुर्भावाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
- ढगाळ वातावरण व आध्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था १० तुडतुडे प्रती पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी यासाठी पोपटी रंगाच्या पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, बोंगे फुटताना लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. किंवा ब्युफ्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली. प्रति १० लिटर पाणी आणि मोहोर फुलल्यानंतर कणी अवस्थेत असताना थायोमेथोक्झाम २५ टक्के दाणेदार १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि. ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टीपः मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ०९.०० ते १२.००) फवारणी करावी. किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
- किमान तापमानात होणारी घट यामुळे आंब्याच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होवून जुन्या मोहोराला असलेली वाटाणा/गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते. यासाठी मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुर्नमोहोर प्रक्रिया टाळणेसाठी जिब्रेलिक अॅसिड या संजीवकाची ५० पी.पी.एम म्हणजेच १ ग्रॅम प्रती २० लिटर पाण्यात मिसळून स्वतंत्र फवारणी झाडाला पुरेसा मोहोर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच झाडावरील मोहोर पूर्ण उमललेला असताना आणि नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळे झाल्यावर करावी. जिब्रेलिक अॅसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या अल्कोहोल मध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावी.
- कमी झालेल्या किमान तापमानामुळे व इतर हवामान घटकांच्या अनुकुलतेमुळे काही ठिकाणी आंबा पिकामध्ये मोहोर धारणा होत आहे. अशा ठिकाणी कोंकण कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मोहोरलेल्या झाडांना फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी आमशक्ती या विद्राव्य अन्नद्रव्याची १ लि. प्रती १९ लि. पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सदर २० लि द्रावण हे चार मोहोरलेल्या झाडांसाठी वापरावे.
- मोहोर धारणा होऊन १५ ते २० दिवस झालेल्या आंबा बागामध्ये काही ठिकाणी फळधारणा होऊन काही ठिकाणी फळे कणी व वाटाणा आकाराची आहेत अशा बागामध्ये चांगल्या प्रतिच्या आंबा फळाच्या उत्पादनाबरोबर आंब्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी १% पोटॅशिअम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकुण ३ फवारण्या कराव्यात.
- वाढणारे किमान तापमान लक्षात घेता हापुस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर २० पीपीएम नॅप्थलीन ऍसीटीक ऍसीड (१ ग्रॅम ५० लिटर पाण्यातुन) या संजीवकाचे द्रावण मोहोरावर फवारावे. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर करावी. नॅप्थेलीन ऍसीटीक ऍसीड प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळुन नंतर पाण्यात मिसळावे.
– ग्रामीण कृषि मौसम सेवा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 15-01-2025
