चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. विनोद नामदेव राठोड (२८, दिग्रस, यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८:४५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री बहादूरशेख नाका येथे रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणारा पांढऱ्या रंगाचा आयशर टेम्पो (क्र. एम एच ०८-एपी ७१७९) आला असता चिपळूण कराड रोडने बाजारपेठेकडे मोटारसायकलला जाणारी (एमएच-२९ सीडी- १३८५) टेम्पोने जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार विनोद नामदेव राठोड हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला व मोठ्या प्रमाणात रक्त सांडले. तो जागीच मृत्युमुखी पडला. अपघात झाला तेव्हा बाजूलाच हवालदार गणेश नाले व एएसआय लिंगायत तेथे होते. त्यांनी दुचाकीस्वाराला रुग्णवाहिकेने कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तर टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरु केली. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपनिरीक्षक विकास निकम, पोलिस उपनिरीक्षक अरुण जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले व मदतकार्य सुरु केले. ही दुचाकी यवतमाळ पासिंग असून ती सचित नामदेव राठोड याच्या मालकीची असल्याचे समजते. पोलिसांकडे याची नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 16/Jan/2025
