चिपळूण : धामणवणेतील कुंभार दाम्पत्य प्रजासत्ताकदिनी जिल्हा परिषदेसमोर करणार उपोषण

चिपळूण : तालुक्यातील धामणवणे पिटलेवाडी येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याबाबत गटविकास अधिकारी चिपळूण यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना तब्बल सात वेळा आदेश दिला होता. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी दिनांक २३ सप्टेंबर २०१४ रोजी धामणवणे सरपंच व ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी आदेशाचे पालन न केल्यामुळे करण्याबाबत पाठवलेल्या अपात्रतेच्या प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर कुंभार दाम्पत्याने जिल्हा परिषदेसमोर प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील धामणवणे पिटलेवाडी येथील जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत सौ. राणी मालसिंग कुंभार व मुखत्यार मानसिंग नानबा कुंभार यांनी अनेकवेळा उपोषण केले होते. या उपोषणासंदर्भात गटविकास अधिकारी चिपळूण यांनी पाठवलेल्या पत्रानुसार सरपंच व ग्रामसेवक यांना हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते. मात्र, ते हटवले गेले नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईच्या पत्रव्यवहार केला होता.

या पत्राची दखल घेत या ४ डिसेंबर २०२४ रोजी जि.प.ने येथे धामणवणे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक सदस्यांच्या अपात्र करण्याबाबत सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीच्या वेळी तक्रारदार स्वतः उपस्थित होते. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती चिपळूण, सरपंच, ग्रामसेवक धामणवणे हे उपस्थित होते. मात्र, या सुनावणीत गटविकास अधिकारी चिपळूण यांच्या पत्रावर योग्य तो खुलासा झाला नसल्याचे राणी मालसिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तक्रारदाराचे कोणते म्हणणे ऐकून न घेता आपण जागेची मोजणी करून घ्या आणि मग ठरवा, असे सांगण्यात आले. मात्र, याची मोजणी मूळ मालकाने १९९६ सालीच केलेली आहे. त्याला आजपर्यंत कोणीच आव्हान दिलेले नाही. कित्येक महिने तक्रारदार यासाठी उपोषण करीत आहेत. मात्र, उपोषणाला बसल्यावर तेवढ्या पुरता समझोता करण्यात येतो.

आता तक्रारदार राणी मालसिंग कुंभार व मुखत्यार मालसिंग कुंभार यंदा चौथ्यांदा जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपोषण करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 18/Jan/2025