रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मिरकरवाडा बंदरातील मासळी उद्योगाची उलाढाल मंदावली आहे. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि कस्टमच्या पथकाकडून अवैध मासेमारीवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नौकांची मासेमारी बंद झाली आहे. यामुळे मासळी मिळण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे.
त्याचवेळी बंदरावर मासळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्यांवर मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून वाढीव कराची मागणी होऊ लागल्याने या बंदरातून मासळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदीच बंद केली आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्याचे अर्थकारण बिघडण्याच्या मार्गावर आहे.
हापूस आंबा आणि मासळी उद्योगांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. आंब्याचा सहा महिने, तर मासळीचा सहा महिने हंगाम असतो. आंबा मोसम सुरू होण्यास अजून तीन महिने आहेत. अशा परिस्थितीत मासळी निर्माण झाली आहे. मच्छीमार नौकांना आधीच समुद्रात मासळी मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यात आता अवैध मासेमारीवर सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त आणि कस्टमच्या पथकाकडून जोरदार कारवाई सुरु झाली आहे. याचे परिणाम म्हणून अनेक मच्छीमार नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. परिणामी मासळी उत्पादन फारच कमी झाले आहे. जिल्ह्यात मिरकरवाडा बंदर हे सर्वात मोठे बंदर असून या बंदरातून दररोज ३० ते ४० ट्रक मासळी केरळ, मंगळुरु, कर्नाटक, कलकोता, गोवा, मुंबईकडे जात होते. आता मासळीच नसल्याने या राज्यांमधील मासळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मासळीच मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे रोजचे ३ ते ४ ट्रक बांगडा, तार्ली, कोळंबी आदी मासळी बाहेर जात आहे. दरम्यान, बंदरावर पूर्वीप्रमाणे रोजच्या रोज मासळी मोठ्या प्रमाणात उतरत नसल्याने या उद्योगावर अवलंबून असलेले इतर पूरक व्यवसायही अडचणीत आले आहेत. परिणामी जिल्ह्याचे अर्थकारण बिघडू लागले आहे. ज्या नौका मालकांनी कर्ज घेवून हा मासेमारी उद्योग सुरु केला आहे, त्यांच्या कर्जाचे हफ्ते जाणेही थांबले आहे.
व्यापारी आपापल्या राज्यात परतू लागले….
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्यांवर सुद्धा या वाहनांना कर भरावा लागत असल्याने सर्व व्यवहार व्यापारांना परवडत नाहीत. त्यामुळे हे व्यापारी आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. मिरकरवाडा बंदरावर सुमारे ७० ते ८० व्यापारी मासळी खरेदी करून आपापल्या राज्यात पाठवतात. आता व्यापाऱ्यांची ही संख्या २५ ते ३० वर आली आहे.
परप्रांतीय नौकांवरही जोरदार कारवाईची गरज
स्थानिक मच्छीमार नौकांवर जशी कारवाई केली जात आहे. तशी राज्याच्या समुद्रात घुसणाऱ्या परप्रांतीय नौकांवरही कारवाई होण्याची गरज असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. परप्रांतीय नौका समुद्राच्या तळापासून पृष्ठभागापर्यंतचा लहान-मोठा मासा जाळ्यात पकडून नेतात. त्यामुळेही समुद्रात मासळी मिळणे कमी झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 20/Jan/2025














