मंडणगडातील तीन गावांत रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी केली वनराईची निर्मिती

चिपळूण : राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी मंडणगड तालुक्यातील तीन गावांत वनराईची निर्मिती करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. जिथे खडकाळ आणि डोंगराळ भागात हिरवळ शोधूनही सापडत नव्हती तेथील परिसर हिरवागार केला आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या उपक्रमात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. वाढते तापमान, पाणीटंचाई आणि इतर कारणांमुळे पर्यावरणाची होत चाललेली हानी लक्षात घेऊन त्यांनी १२ एकर डोंगराळ आणि खडकाळ भागात तब्बल ३९ हजार ५०० रोपांची लागवड केली आहे.

सोवेली (या. मंडणगड) हे त्यांचे जन्मगाव, माजी मंत्री रामदास कदम यांच्याशी लग्न केल्यानंतरही ज्योती कदम बालपण घालवलेल्या गावाला विसरल्या नाहीत, कदमांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. ज्योती कदम या मात्र ग्रामीण भागातील लोकांना निसर्गसाक्षर करण्यासाठी झगडत आहेत. त्यासाठी प्रथम त्यांनी आपल्या गावापासून सुरुवात केली आहे. मानवी जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करायचे असेल तर निसर्गसाक्षर व्हायला हवे, हा मूलमंत्र त्यांनी आपल्या गावातील नागरिकांना दिला आहे.

२०२० पासून त्यांची वनराई बंधारे आणि वृक्षारोपणात भरीव काम करण्यास सुरुवात केली. या तालुक्यातील शेनाळे, सोवेली आणि शिरगाव या तीन गावांतील डोंगराळ आणि खडकाळ भागात वनराईची खूप कमतरता आहे, असे लक्षात आल्यानंतर त्यां स्थानिकांच्या मदतीने पर्यावरणाची सेवा करण्यासाठी फळझाडे तसेच मोठे वृक्ष तयार होतील, अशा प्रकारची विविध रोपे तयार केली. या ठिकाणच्या जमिनीची योग्य मशागत करून त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर करून शिसम, रक्तचंदन, जाम, फणस, बांबू कोकम, नारळ, सुपारी, जांभूळ, काजू, साग, आंबा, लिंबू अशा उपयुक्त णाऱ्या ३९ हजार ५०० रोपांची लागवड केली. या वनराईतील झाडे आता मोठी झाली आहेत. त्यामुळे वनराईमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, कोकिळा, सुतारपक्षी व इतर विविध लहान-मोठे पक्षी येतात, बिबट्या, कोल्हा, भेकर, पिसोरी, रानडुक्कर, नीलगाय, रानगवा यासारख्या प्राण्यांना आश्रयस्थान म्हणून ही वनमाई उपयुक्त ठरत आहे. या वनराईमध्ये वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ४ पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

ही वनराई नागरिकांचे मानसिक आरोग्य जपते. येथे पुण्या, मुंबईचे पर्यटक येतात, क्षणभर विसावा घेण्यासाठी या वनराईत थांबतात. मनाचा व शरीराचा थकवा दूर करतात व नंतर मार्गस्थ होतात.

कोकणातील शेतकऱ्यांनी शाश्वत शेती करावी, हा संदेश देण्यासाठी मी स्थानिकांच्या मदतीने वनराई उभी केली. शेतकऱ्यांनी वनशेती करून स्वतःचा व पर्यायाने कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा विकास करावा, हीच माझी अपेक्षा आहे. वृक्ष लागवडीचा जो वसा मी हाती घेतला आहे तसाच फक्त कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने घेतला पाहिजे ज्योती कदम, ता. खेड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 21/Jan/2025