रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत झोपड्या बांधकाम हटविण्यासंदर्भात येणारी नोटीस अचानक स्थगित होऊन कारवाई थांबण्याचा इतिहास आहे. गेल्या २० वर्षांत अशा अनेक नोटीस आल्या आणि कारवाई झालीच नाही. त्यामुळे यावेळी बंदरावरील झोपड्या, बांधकाम करून बांधलेल्या खोल्यांमधील साहित्य हटवलेले नाही, ना बांधकाम, ना झोपड्या हटवल्या. मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडून बंदरावरील अनधिकृत बांधकामे झोपड्या हटविण्यासाठी २३ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
मिरकरवाडा बंदराच्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत झोपड्या, कावन, बांधकामे आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी अनेक वेळा नोटीस बजावण्यात आल्या. सुमारे २० वर्षांपूर्वी येथील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटविले होते.
मिरकरवाडा बंदरात पुन्हा नव्याने झोपड्या, बांधकामे उभारली गेली. त्यानंतर वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात आली. परंतु या नोटीसनुसार कारवाई अचानकपणे थांबली होती. यातील अनेक झोपड्या भाड्याने दिल्या आहेत. आता येथील मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ मधील विकासकामे करायची असल्याने मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण हटविण्यासाठी ३०० पेक्षा अधिक जणांना नोटीस बजावली. पहिल्या नोटीसनंतर १० दिवसांपूर्वी दुसरी नोटीस बजावून अतिक्रमण २३ जानेवारीपर्यंत स्वतःहून हटविण्यास सूचीत करण्यात आले होते. परंतु नोटीसनुसार कारवाई होत नसल्याचा इतिहास असल्याने २३ तारखेपर्यंत बंदरावरील अतिक्रमण होते तसेच आहे.
न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल नोटिसची मुदत संपल्यानंतर लगेचच
शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होणार असल्याची बातमी पसरल्यानंतर झोपड्या बांधणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. कारवाईच्या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी रत्नागिरीत आले असल्याचे समजल्यानंतर भीतीही निर्माण झाली आहे. अतिक्रमण करणारे न्यायालयात धाव घेण्याच्या शक्यतेने मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडून न्यायालयात ‘कॅव्हेट’ ही दाखल करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 24/Jan/2025














