चिपळूण आगारात बीएस ६ प्रणालीच्या दोन बस दाखल

चिपळूण : चिपळूण आगारासाठी नवीन बीएस ६ प्रणालीच्या दोन एसटी बसेस मिळाल्या आहेत. वास्तविक चिपळूण आगार हे कोकणातील मध्यवर्ती आहे. या ठिकाणी दिवसभरात आठशेहून अधिक फेऱ्या चालतात. मुंबई ते गोवा तर अगदी कर्नाटक ते बीडपर्यंत या आगारातून बसफेऱ्या धावतात. त्यामुळे येथील अनेक एसटी गाड्यांची अवस्था बिकट झालेली असताना अवघ्या नव्या दोन गाड्या या आगाराला मिळाल्या आहेत.

एसटी महामंडळाकडून महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी विविध योजनेंतर्गत सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेसह अद्ययावत सुविधा देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दरवर्षी नवीन बीएस ६ प्रणालीच्या पाच हजार बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार महामंडळाने काही बसेस खरेदी केल्या असून रत्नागिरी विभागासाठी दहा बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये चिपळूण आगाराला दोन बसेस मिळाल्या आहेत. कोकणातील नागमोडी अवघड मार्गावर अशोक लेलँडच्याच गाड्या सोयीस्कर ठरत असल्याने महामंडळाने या गाड्या खरेदी केल्या आहेत. कंपनीकडून जसजशा बसेस उपलब्ध होतील त्यानुसार मागणीप्रमाणे संबंधित विभागांना गाड्यांचे वितरण केले जाणार आहे.

चिपळूण आगारात सध्या ९ शिवशाही, ६ स्लीपर, १७ खाजगी व १२३ साधी अशा एकूण १५५ बसेस आहेत. गाड्यांची संख्या कमी असल्याने सध्या खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र तरीही या बसेस अपुऱ्या पडत आहेत.

चिपळूण आगारात दाखल झालेल्या नवीन बीएस ६ प्रणालीच्या लालपरीची इंधन टाकीची क्षमता ३५० लिटरची आहे. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी या बसचा चांगला फायदा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 27/Jan/2025