खेड : तालुक्यातील कशेडी येथे अनोळखी शिकाऱ्याकडून मोराच्या झालेल्या शिकारीनंतर येथील वनविभाग खडबडून जागे झाले आहे. शिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे. यासाठी गुप्त पथकामार्फतही करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तालुक्यात मोराची शिकार करणारी एक टोळीच कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे.
कर्टेल-सुकिवली मार्गावर मोराची शिकार होत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता; मात्र याची कुणकुण लागताच शिकाऱ्यांनी पोबारा केला होता. यानंतर शिकाऱ्यांनी दुसऱ्या गावाची निवड केल्याचे पुढे आले आहे. कशेडी येथील एका शेतानजीक वावरणारा मोर गायब झाल्याचे लक्षात येताच काही ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतात मोराची पिसें आढळली होती. शिकाऱ्याच्या शोधासाठी वनविभागाच्या पथकाने जंगलमय भागावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोराची शिकार करणाऱ्यांना नक्कीच गजाआड करू, असा विश्वासही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 01/Oct/2024