संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील आरवली बाजारपेठेतील रखडलेले सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाच्या कामासह गटारबांधणीची कामे कंपनीकडून सुरू केली आहेत. त्यासाठी प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तहसीलदारांनी बैठक घेऊन ठेकेदाराला सूचना केल्यामुळे हे काम तातडीने सुरू करण्यात आले.
आरवली बाजारपेठेतील उड्डाणपुलाच्या बाजूने दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांना धूळमातीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या गटाराचे कामही झालेली नाही. या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ दिनेश परकर यांनी इतर ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वरच्या तहसीलदारांनी ठेकेदार म्हात्रे कंपनीचे प्रतिनिधी बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच उपोषणकर्ते ग्रामस्थ यांची एक संयुक्त बैठक प्रजासत्ताक दिनापूर्वी घेण्यात आली. त्यामध्ये गटाराचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले. मार्च अखेरपर्यंत आरवली बाजारपेठेतील सर्व्हिस रोडचे डांबरीकरण तसेच गटाराचे कामदेखील पूर्ण केले जाणार आहे. सध्या रस्त्याच्या बाजूंनी जाणारे गटार खोदण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. ते पूर्ण झाल्यावर दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 29/Jan/2025














