चिपळूण : राजापूर तालुक्यातील जामदा प्रकल्पग्रस्तांनी चिपळूण येथील पाटबंधारे प्रकल्पातील बांधकाम विभाग कार्यालयावर धडक दिली. येथील उपविभागीय अधिकारी जावेद इनामदार यांना भूसंपादन प्रक्रियेतून काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. तशी तक्रार आ. किरण सामंत यांच्याकडे करून तसा ठराव प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेतही करुन घेतला.
राजापूर तालुक्यातील काजिर्डे गावातील ग्रामस्थांनी यापूर्वीच संबंधित पाटबंधारे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी इनामदार यांच्याविरोधात सातत्याने दंड थोपटले होते. या अधिकाऱ्याला काजिर्डा भूसंपादनमधून काढून टाकावे व एक चांगला अधिकारी द्यावा, यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी, अधीक्षक अभियंता रत्नागिरी, कार्यकारी अभियंता चिपळूण व आ. सामंत यांची भेट घेऊन तक्रार केली होती. यानंतर ग्रामसभेत ठराव करुन दि. २७जानेवारी रोजी इनामदार यांच्या चिपळूण येथील कार्यालयात धडक मोर्चा प्रकल्पग्रस्तांनी आणला होता मात्र, पूर्वसूचना देऊनही त्यांनी नेहमीप्रमाणे दांडी मारल्याने प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला.
संबंधित अधिकारी ग्रामस्थांची बैठक किंवा कोणतीही चर्चा न करता गावातील काही लोकांच्या तालावर नाचत असून प्रकल्पग्रस्तांचे प्रचंड नुकसान करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. गावातील प्रकल्पग्रस्तांमध्ये विनाकारण वाद, भूसंपादनाचे कोणतेही नियम माहीत नसणे व लोकांच्या समस्या न सोडविणारे हे अधिकारी असून त्यांना या प्रक्रियेतून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत लोकायुक्त महाराष्ट्र राज्य, पोलिस अधीक्षक रत्नागिरी, प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन इनामदार यांची विभागीय चौकशी लावण्यात येणार आहे. आठवड्यातून १ दिवस कार्यालयात हजर असणारे इनामदार १५ वर्षे काम पूर्ण करू शकणार नाहीत मग प्रकल्पावर त्यानाच ठेवण्याचा प्रयत्न का केला जात असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 29/Jan/2025














