रत्नागिरी : देवरुख आगाराच्या गरजांकडे दुर्लक्ष..

साडवली : राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यानी तसेच परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. जिल्ह्यातील बस वाटपात देवरुख आगारावर सलग पाचव्यांदा अन्याय करण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने दापोली आणि चिपळूण आगारांवर झुकते माप देताना देवरुख आगाराच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आहे.

मार्च २०२० मध्ये १०५ गाड्यांचा ताफा असलेला देवरुख आगार आज केवळ ६० गाड्यांवर येऊन ठेपला आहे. मोडकळीस आलेल्या बस, तांत्रिक अडचणी आणि कर्मचारी टंचाईमुळे तालुक्यातील स्थानिक प्रवासी सेवांमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. लांब पल्याच्या अनेक फेऱ्या बंद केल्याने आगाराचे उत्पन्न कमी झाले असून तोटा सहन करणाऱ्या आगारांच्या पदरात देवरुखचा समावेश झाला आहे.

चिपळूण आणि दापोली आगारांवर प्रशासनाने एसटी विशेष कृपादृष्टी आहे. चिपळूणला पूर्वीच २० खासगी गाड्या देण्यात आल्या होत्या, तर आता तिथे २५ इलेक्ट्रिक बस पुरवल्या जात आहेत.

दापोलीत चार्जिंग पॉईंट उभारून ३२ इलेक्ट्रिक बस देण्याची तयारी आहे. मात्र, देवरुखला डिझेलच्या गाड्याही न मिळाल्याने प्रवासीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. देवरुखातील प्रवाशांचा प्रशासन विचार करणार की नाही असा सवालही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

जनता झाली आक्रमक
संगमेश्वर तालुक्यातील जनता एसटी प्रश्नी आता आक्रमक झाली आहे. स्थानिक प्रवासी, विविध नेते एकत्र येत आहेत. जोपर्यंत देवरुख आगारासाठी ३० नवीन गाड्या जाहीर होत नाहीत आणि त्या देवरुख आगारात पाठवल्या जात नाहीत, तोपर्यंत देवरुख, संगमेश्वर, साखरपा येथील सर्व बसस्थानकांवरून एकही बस सोडली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 30/Jan/2025