रत्नागिरी : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश जारी केले आहेत. यानुसार ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने होणाऱ्या “स्पर्श अभियान जनजागृती अभियान”बाबत जिल्हास्तरीय समन्वय सभा आज (२९ जानेवारी) जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व कुष्ठरुग्णांच्या सहवासितांचे सर्वेक्षण करून जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढणे व त्यांना ट्रीटमेंट खाली आणणे, स्पर्श कुष्ठरोग अभियानाचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन वाचन व प्रतिज्ञाचे वाचन सर्व ग्रामसभेत करावे व अभियान कालावधीत कुष्ठरोगाबाबत असणारे समज गैरसमज व लक्षणे, तपासणी, औषधोपचार याबाबत जनजागृती करावी अशा सूचना देऊन कुष्ठरोग कार्यक्रमाचा सखोल आढावा घेतला.

३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या “स्पर्श” अभियान कालावधीत जनजागृतीपर होणाऱ्या कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती कुष्ठरोग- सहाय्यक संचालक डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी दिली. या सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनिधी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, समाज कल्याण अधिकारी प्रतिनिधी म्हणून विश्वनाथ वामन बोडखे, शिक्षणाधिकारी प्रतिनिधी म्हणून उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.मिताली अनिल मोडक जिल्हा आशा समन्वयक अभिजीत कांबळे, कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय सहाय्यक शरदकुमार जाधव आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्श मोहिमेत होणारे जनजागृती कार्यक्रम
३० जानेवारी रोजी प्रत्येक ग्रामसभेत मा.जिल्हाधिकारी यांचे स्पर्श अभियानाबाबत आवाहन व कुष्ठरोग बाबत प्रतिज्ञेचे वाचन, मोहीम काळात शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबत प्रतिज्ञा, फलकावर कुष्ठरोग संदेश लिहिणे,नुक्कड-नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, कटपुतळी, चित्रकला स्पर्धा, पथनाटय,शालेय विद्यार्थीची प्रभात फेरीचे आयोजन तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा अशा माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती कुष्ठरोग- सहाय्यक संचालक डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 30/Jan/2025