मोडीची गोडी प्रचारक बनून इतरांनाही लावा : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी : सराव माणसाला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करुन तिची गोडी प्रचारक बनून इतरानांही लावा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेत समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, कोल्हापूर पुरालेखागार संशोधन सहायक सर्जेराव वाडकर, पुणे लेखागाराचे संशोधन सहायक लक्ष्मण भिसे उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर ती कायमस्वरुपी दृढ करण्याच्या दृष्टीकोनातून तिचा सराव करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मोडीलिपीचे घेतलेले ज्ञान हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता तिचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रचारक म्हणून काम करा, असे सांगून मोडीचा इतिहास, भाषानिर्मिती आणि बोरु या विषयी माहिती दिली.

प्राचार्य डॉ. साखळकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महाविद्यालयात घेतलेल्या मोडीलिपी प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. मिळालेल्या नवीन कौशल्याच्या आधारावर व्यक्तीमत्व विकास त्याबरोबरच करिअर देखील उंचावता येते. संशोधन सहायक श्री. वाडकर यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. पंकज घाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षणार्थींनीही आपला अनुभव कथन केला. प्रा. मधुरा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थी ओंकार आठवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 30-01-2025