खेडमध्ये ८ फेब्रुवारीला क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे ७ वे राज्यस्तरीय कुलसंमेलन

खेड : क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे ७वे राज्यस्तरीय कुलसंमेलन ८ व ९ फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील जामगे येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या संमेलनाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याहस्ते होईल.

यावेळी गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक यासह अनेक राज्यातील विखुरलेल्या कदम कुळातील मान्यवर या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवस्थान परिसरात ८ रोजी संपूर्ण दिवस व ९ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सभापती अरुण कदम, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष स. तु. कदम आदींसह अन्य उपस्थित होते.

यावेळी अरुण कदम म्हणाले, सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. कुलदेवता श्री तुळजाभवानीचा जागरण व गोंधळ, ग्रामदेवता श्री कोटेश्वरी मानाई देवी दर्शन सोहळा, कदम राजवंशाचा ध्वजारोहण, विविध व्याख्याने, शस्त्र प्रदर्शन जामगे येथे होणार आहे. मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवे संमेलन यावर्षी खेडमधील जामगे या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्रातील सर्व कदम घरातील व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कदम कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी दरवर्षी हे संमेलन होते. आतापर्यंत तुळजापूर, गिरवी, गलांडवाडी, नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी हे संमेलन झाले आहे. कदम बंधूंनी या संमेलनात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 31/Jan/2025