गोळप-पावस बायपासचे काम पूर्ण करा; अन्यथा तीव्र आंदोलन

पावस : तालुक्यामधील गोळप येथील कोळंबेफाट्यापासून सुरू होणारा तेरवणकरवाडी, पंचशील नगर ते गोळप पावस बायपासला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. हा रस्ता ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे गैरसोय होत आहे, तरी या रस्त्याचे काम वेळेत सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोळप ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत साडेचार कोटी अंदाजित खर्चाचा व सुमारे ५. ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे फेब्रुवारी २०२४ मध्ये रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू केले होते. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी ते थांबवण्यात आले असून, पावसाळ्यानंतर त्वरित पुन्हा उर्वरित मजबुतीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सुरू होणे क्रमप्राप्त होते. तसे झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता धुपून गेल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालक व ग्रामस्थ, पादचारी यांना त्रास होतो. विशेषतः दाभीळवाडी शाळेजवळ रस्ता जास्तच असुरक्षित झालेला असून, तेथे अधूनमधून वाहनांना अपघात होत असतात. त्यामुळे तेथून वाहनाने ये-जा करणाऱ्या वाहनचालक व इतर ग्रामस्थांना अडचणीचे, गैरसोयीचे व असुरक्षिततेचे झाले आहे. या मार्गाचे काम त्वरित सुरू करून रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम जलदगतीने दर्जेदाररित्या पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ जनतेची व गोळप पंचक्रोशी पूर्व विभाग विकास महासंघाकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 04/Feb/2025