दापोली : चाळीस वर्षे प्रलंबित हर्णे जेटीचे काम सुरू

दापोली : अनेक वर्षे प्रलंबित असलेला हर्णे जेटीचा विषय मार्गी लागला असून, नुकतीच जेटीच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. कनकदुर्ग किल्ल्याच्या बाजूने काम सुरू केले आहे. गेले ४० वर्षापूर्वी मंजूर झालेले हर्णे जेट्टीचे काम लालफितीत अडकले होते. यासाठी स्थानिक तसेच जिल्हाभरातील मच्छीमार बांधवांनी वेळोवेळी आवाज उठवला होता; मात्र गेली अनेक वर्ष त्यांच्या या लढ्याला यश येत नव्हते. दापोलीचे तत्कालीन आमदार व विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम व खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला गती प्राप्त झाली.

प्रत्यक्षात कामाला सुरवात झाल्याने येथील मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर जेटीचे काम हे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून होत असून, हीं बंदर सुसज्ज होण्याच्या मार्गावर असल्याची भावना मच्छीमार बांधवांमध्ये बोलताना दिसून येत आहे.

कोकण किनारपट्टीचा असलेले ही बंदरामध्ये रोज करोडोंची मासेमारीची उलाढाल होत असत. या बंदातून कोट्यवधी रुपयाचे परकीय चलन मिळत आहे; परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमार जेटीचा अभाव असल्याने इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने हर्णे बंदरात जेट्टी मंजूर केली आहे.

जेटीअभावी येथील मच्छीमारांनी अनेक समस्यांना तोंड दिले आहे. अनेक वादळांमध्ये वित्तहानी तर झालीच आहे; परंतु जीवितहानीदेखील झाली आहे. जेटी नसल्याने मच्छीमारांना आपल्या मासळी उद्योगामध्ये अद्ययावत होता येत नव्हते. येथील मच्छीमार अजूनही पारंपरिक मासेमारीवरच अवलंबून आहे.

गेली ४० वर्षे प्रलंबित असलेले हर्णे जेटीचे काम मार्गी लागले असून, कामाला सुरवातदेखील झाली आहे. ही आम्हा मच्छीमार बांधवांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. याबाबत राज्यमंत्री योगेश कदम व विद्यमान सरकारचे आम्ही खूप आभारी आहोत. – हरेश कुलावकर, अध्यक्ष, ओंकार मच्छीमार सहकारी सोसायटी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 04/Feb/2025