ब्रेकिंग : Akshay Shinde Encounter | ‘आम्हाला ही केस लढवायची नाही’, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका

मुंबई : आम्हाला केस लढवायचे नाही, अशी खळबळजनक भूमिका अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) पालकांनी घेतलेली आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, आम्हाला ही धावपळ आता जमत नाही, असे म्हणत अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केस लढण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणावर उद्या शुक्रवारी (दि. 07) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय यावर काय निर्णय घेणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट होता आणि त्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पाच पोलिसांवर काय कारवाई केली? या प्रकरणावर आज दिवसभर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र आजच्या दिवशीचे काम संपताना कोर्टात उपस्थित असलेल्या अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी पुढे येत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडे हात जोडून विनंती केली.

हायकोर्टात उद्या पुन्हा सुनावणी

अक्षय शिंदेचे बनावट एन्काऊंटरचे प्रकरण आता यापुढे आम्हाला न्यायालयात लढवायचे नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. याबाबत कोर्टाने तुम्ही असा निर्णय का घेतात आहात? असे विचारले आता अक्षय शिंदेचे आई वडील म्हणाले की, आता ही धावपळ आम्हाला जमत नाही. आमच्या सुनेला नुकतेच मूल जन्माला आलेले आहे. आम्हाला आता त्याच्याकडे जायचे आहे. त्यामुळे ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. आमच्या राहण्याची कुठेही सोय नाही. त्यामुळे अशात आम्हाला हा न्यायालयीन लढा लढायचा नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. आता यावर हायकोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या या संदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

दरम्यान, आज रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बदलापूर अत्याचार प्रकरणी सुनावणी पार पडली. यात पोलिसांवर बनावट एन्कांऊटर केल्याचा आरोप करणारा अहवाल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यास राज्य सरकारची हरकत नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी हायकोर्टात दिली. याचिकाकर्ते पोलीस अधिकाऱ्यांना अर्ज करून अहवालाची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची याचिका हायकोर्टाकडून निकाली लागली आहे. तर बनावट एन्काऊंटरप्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. या प्रकरणाची स्टेट सीआयडीकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली आहे. यानंतर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला ही केस लढवायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता यावर उद्या सुनावणी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 06-02-2025