रत्नागिरी : राज्यातील मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी न्यायालयाचा आदर ठेवत आपण उपोषण मागे घेत असल्याचं म्हटलं. दुसरीकडे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं असून सगेसोयरे संदर्भाने सध्या काम सुरू आहे, असं शासनाकडून सांगण्यात येतंय.
त्यामुळे, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या हाताला काय लागलं, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांत होणार असून ओसीबीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अद्यापही कायम आहे. त्यातच, आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरुन त्यांनी सवाल उपस्थित केलाय.
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करुन त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले होते. मात्र, त्यानंतरही मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य न झाल्याने एकनाथ शिंदेंनी सगेसोयरे संदर्भात दिलेल्या शब्दाचे काय झाले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटील यांचा बळी घेतलाय, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ घेऊन, खोटे जीआर काढणाऱ्या चाणक्याने एकनाथ शिंदे यांना पुढे करून सध्या सरळ जरांगे पाटील यांचा विश्वासघात केलाय. एकनाथ शिंदे यांना पुढे करणारा चाणक्यच लक्ष्मण हाकेंच्या मागे आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. तसेच, विश्वासघात करणाऱ्याला महाराष्ट्र माफ करत नाही, जनता विश्वासघात करणाऱ्यांना माफ करत नाही.राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः हैदोस मांडलाय. राज्यातील जनता हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघत आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता यांना घरी पाठवणारच, असेही जाधव म्हणाले. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः हैदोस मांडलाय. राज्यातील जनता हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघत आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता यांना घरी पाठवणारच, असेही जाधव यांनी म्हटले.
भाजपा शिंदे-पवारांना खड्ड्यात टाकणार
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप हळू हळू खड्ड्यात टाकणार आहे. राज्यातील विधानसभा 2024 ची निवडणूक अमित शहा यांना भाजपच्या नेतृत्वात लढायची होती. मात्र, सध्या स्वबळावर भाजप येणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप निवडून लढतंय, असे म्हणत अमित शहा यांनी 2029 ला भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, या वक्तव्यावरुन शिवसेना व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
राज्यातील सर्व बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर करणार का?
अक्षय शिंदे प्रमाणे राज्यातील सर्व बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर करणार का?, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे आम्हाला दुःख नाही. पण, कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 02-10-2024