◼️ आमदार किरण सामंत घालणार लक्ष
राजापूर : साखरीनाटे येथील बंदर आपल्या जेटी निर्माण प्रकल्प विरोधात पुकारण्यात आलेले जलसमाधी आंदोलन आमदार किरण सामंत यांनी केलेल्या मध्यस्तीमुळे स्थगित केले आहे. २० तारखेपर्यंत याबाबत संयुक्त बैठक होऊन उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा होऊन समाधान न झाल्यास भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजापुरात रविवारी (ता. ९) झालेल्या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर, जयेंद्र कोठारकर, माजी तालुकाध्यक्ष सुनील जठार उपस्थित होते. आमचा विकासाला कोणताही विरोध नाही. परंतु याची जी प्रक्रिया आहे त्याला आमचा प्रखर विरोध आहे. या प्रकल्पाच्या सुरवातीला जी जनसुनावणी जाली ती मुळात चुकीच्या प्रकारे घेतली तेव्हाच आम्ही आक्षेप नोंदविला होता. सदर प्रकल्प अहवाल इंग्रजीमध्ये आहे तो मराठीत द्यावा, अशी आमची मागणी आहे.
जेटी फक्त साखरीनाटेच्या मच्छीमार बांधवांपुरती मर्यादित असेल की आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमारांसाठीही असेल, जेटी ही फक्त मासेमारांसाठीच असेल का इतर जहाजांच्या वाहतूक, माल चढविणे उतरविणे यासाठी पण असेल, जेटीवरील मलनिस्सारणचे नियोजन काय आहे, बोट बांधणी व दुरुस्तीची व्यवस्था केली आहे का, आदी प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. याबाबत आमदार किरण सामंत यांनी पुढील आठ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे श्री. सौंदळकर यांनी सांगितले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 10-02-2025














