माघी जयंतीच्या POP गणेशमूर्तींचं विसर्जन रखडलं; मूर्तिकार संघटना, मंडळाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई : माघी गणेशोत्सवात (Maghi Ganpati 2025) पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन (Mumbai Ganesh Visarjan) करू न दिल्याने मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि मूर्तीकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

दरम्यान, आता याच मुद्याला घेऊन मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या 24 तासात पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला परवानगी द्या

माघी गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी न दिल्याने उपनगरातील अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती या अजूनही मंडपात आहेत. पीओपी गणेश मूर्ती संदर्भात अचानक निर्बंध लादले गेल्याने आणि गणेश मूर्तींचे विसर्जन रखडल्याने गणेश उत्सव मंडळ त्यासोबतच मूर्तिकार संघटनांनी ही संताप व्यक्त केला आहे. याशिवाय येत्या 24 तासात या पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला परवानगी देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. किंबहुना ही मागणी मान्य नं केल्यास हजारो गणेश भक्तांच्या सोबत जाऊन या गणेशमूर्तींचे विसर्जन करणार असल्याचा इशारा सुद्धा मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तोडगा निघणार?

अशातच, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि मूर्तिकार चर्चा करणार आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर त्यांची बैठक बोलण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत कांही तोडगा निघतो का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

न्यायालया निर्देशानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींवर निर्बंध लादलेले असताना त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती गोराई येथे विसर्जनाला आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार या मूर्तींचे विसर्जन करू दिले नाही. त्यामुळे या पीओपीच्या उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती पुन्हा एकदा मंडपात मंडळाकडून देण्यात आले असून त्या झाकून ठेवण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारे नियमावलीची किंवा त्याच्या अंमलबजावणीची मंडळाशी शिवाय मूर्तिकरांशी चर्चा न करता अशाप्रकारे पीओपीच्या मूर्ती विसर्जनासाठी थांबून ठेवल्याने मंडळांनी संताप व्यक्त केला आहे.

आम्ही गणेश मूर्तींचे विसर्जन कसं करायचं? असा प्रश्न मुंबई महापालिका आणि प्रशासनाला त्यांनी विचारला आहे. त्याशिवाय येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्ती संदर्भात नेमके निर्णय काय आहेत? हे स्पष्ट नसल्याने मूर्तिकार सुद्धा संभ्रमात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 10-02-2025