रत्नागिरी : काजू अनुदानासाठी जिल्ह्यातील ४८५ शेतकऱ्यांचे अर्ज

रत्नागिरी : राज्य शासनाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर व पालघर या जिह्यांमध्ये उत्पादनक्षम काजूच्या झाडापासून प्रति झाड सरासरी १० किलो काजू बीचे होत असलेले उत्पादन विचारात घेऊन शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रति किलो १० रु. याप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २ हजार किलो या मयदिपर्यंत शासन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून केवळ ४८५ काजू बी उत्पादक शेतकऱ्यांनी येथील विभागीय काजू मंडळाकडे अर्ज केले आहेत.

महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखालील सुमारे १.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातून सुमारे १.८१ लाख मे.टन उत्पादन मिळते. विशेष म्हणजे देशामध्ये महाराष्ट्राची काजू उत्पादकता सर्वात जास्त म्हणजे हेक्टरी ९८२ किलो इतकी आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर व पालघर या जिह्यांमध्ये काजूचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. महाराष्ट्रातील काजूची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. त्यामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला काजूला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे.

महाराष्ट्रातील काजू पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र हे गोवा राज्याच्या पाच पट अधिक आहे. त्यामुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेऊन, सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू बी साठी प्रति किलो शासन अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यासाठी योजनेस मान्यता देण्यात आली आणि तसा शासन निर्णयही काढण्यात आला.

या योजनेतून रत्नागिरी जिह्यामधील ४८५ संबंधित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयाकडे सादर केले होते. त्यांचे प्राप्त अर्ज महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर झाले. या दोन्ही कार्यालयांनी प्राप्त अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 11/Feb/2025