फ्रान्सला पोहचण्यापूर्वी ४६ मिनिटे पंतप्रधान मोदींचं विमान पाकिस्तानात…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पॅरिस दौऱ्याला जाण्यासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर केला. इंडिया १ विमानाने मोदी पॅरिस दौऱ्यावर गेले. या विमानाने पाकिस्तानातील शेखपुरा, हफीजाबाद, चकवाल आणि कोहाट हवाई हद्दीतून प्रवास केला.

जवळपास ४६ मिनिटे विमान पाकिस्तानच्या सीमेत होते.

एआरवाय न्यूजनुसार, अफगाणिस्तान हवाई क्षेत्र बंद असल्यानं भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला, याआधी मागील ऑगस्ट २०२४ मध्ये पोलँड ते दिल्ली प्रवासासाठी मोदींच्या विमानाकडून पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यात आला. त्यावेळी रात्री ११ च्या सुमारास मोदींचे विमान पाकिस्तानी सीमेत शिरले. तिथे ४६ मिनिटे हे विमान पाकिस्तानात होते.

पाकिस्तान-भारत हवाई संबंध कसे?

मार्च २०१९ मध्ये पाकिस्तानने नागरी उड्डाणांसाठीचे सर्व हवाई निर्बंध उठवले, जे जवळजवळ पाच महिने बंद होते. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४४ भारतीय निमलष्करी पोलिस अधिकारी शहीद झाल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला. यानंतर ऑगस्ट २०१९ मध्येजेव्हा नरेंद्र मोदींच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५अ रद्द केले तेव्हा पाकिस्तानने भारताशी असलेले राजनैतिक संबंध कमी केले. याशिवाय, दोन्ही देशांमधील परस्पर द्विपक्षीय व्यापार स्थगित करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध सामान्य राहिलेले नाहीत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी एआय समिटला उपस्थित राहिले, या ठिकाणी विविध देशांचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 12-02-2025