चिपळूण : चिपळूण येथील वन विभागाच्यावतीने तालुक्यातील टेरव आणि कळवंडे येथील कोळसा भट्टयांवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात बारा कोळसा भट्टया उद्ध्वस्त करून १८ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. मात्र, या कारवाईत अद्यापपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
ज्या जागेत कोळसा भट्टया धगधगत होत्या, ज्याठिकाणी भट्टीसाठी लागणारा लाकूडसाठा सापडला, वनविभागाने कारवाई करीत हा लाकूडसाठा जप्तही केला. १२ कोळसाभट्ट्या उद्ध्वस्त केल्याचे जाहीर केले. तालुक्यातील टेरव येथे वनविभागाने सातत्याने कोळसा भट्टयांवर कारवाई केल्या आहेत. सततच्या कारवायामुळे येथे कोळसा भट्टयांना काहींसा लगाम बसला.
दरम्यान, कळवंडे येथे कोळसा भट्टया धगधगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कळवंडे माडवाडी येथील डोंगरात १२ कोळसा भट्टया उद्ध्वस्त केल्या आहेत. मात्र, या कारवाईत अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. भट्टया लावणाऱ्या व्यावसायिकांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध घेतला जात आहे.
दोन वेगवेगळ्या जागेत १२ कोळसा भट्टया धगधगत होत्या. त्यासाठी तितक्याच पटीने लाकडाचा वापर केला गेला. या भट्टया कोणाच्या जागेत लावण्यात आल्या, त्या कोणी लावल्या, यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड कोठून आणले, कोणाचे जंगल तोडले, जंगल तोडण्यास परवानगी होती का, असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर निर्माण झाले आहे. या अनुषंगाने वनविभाग तपास करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 14/Feb/2025














