रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस नामदार डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री तथा पालक मंत्री रत्नागिरी जिल्हा यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. सदर कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, बँकेचे सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण व बँकेचे अधिकारी / कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी केले, रत्नागिरी जिल्हा बँकेने केलेल्या सत्कार प्रसंगी बोलताना, नामदार डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद असून, डॉ. चोरगे सरांनी बँक शुन्यातून उभी केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने भरारी घेतली आहे. रत्नागिरी जिल्हा बँक भारतातीलच नव्हे तर जगातील ३०% लाभांश देणारी सहकारातील एकमेव बँक आहे. अशा या नेतृत्वाला, म्हणजे डॉ. चोरगे सरांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला माझा आतापर्यंत नेहमीच पाठींबा राहिलेला आहे आणि यापुढेही सर बँकेत जो काही निर्णय घेतील त्याला माझा पूर्ण पाठींबा राहील. आतापर्यंत सरांनी ज्या-ज्या वेळी निवडणुकीसाठी पॅनल केले, त्या-त्या वेळी मी सरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो व यापुढे सुध्दा सदैव मी सरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, याची मी आज ग्वाही देतो. मला डॉ. चोरगे सरांचा आदर आदर आहे, सरांच्या बद्दल विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच आजही तुमची आमची बँक उभी आहे. त्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे सर यांची शिस्त व त्यास बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाले, असे गौरवोद्गार नामदार डॉ. उदय सामंत यांनी डॉ. सरांच्या व बँकेच्या बाबतीत काढले.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेली जिल्हा बँक म्हणून नाव कमावले आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांकरीता आधुनिक बँकींग सेवा सुविधा उपलब्ध करुन देऊन बँकेची प्रगती साधण्यावर लक्ष केंद्रीत केले. यात जिल्हा बँक पूर्णपणे यशस्वी झाली आहे. म्हणूनच आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये घेतले जाते. शासनाचे परिपत्रकानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या १५ जिल्हा बँकांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पेन्शनधारक यांची खाती जिल्हा बँकेत उघडण्याबाबत निर्णय झालेला असून, सदर १५ जिल्हा बँकांमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे, याचा मला रास्त अभिमान वाटतो. जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची व पेन्शनधारकांची खाती बँकेत उघडणेसंदर्भात संबंधित शासकीय खात्याचे अधिकारी यांना आदेश देणेबाबत मी जिल्हाधिकारी यांना तात्काळ सूचना करणार आहे. बँकेने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत जास्तीत जास्त योग्य कर्जप्रकरणे करून, होतकरू तरूणांना कर्ज देऊन, या कर्जयोजनेचा लाभ द्यावा, बँकेकडून शासनाच्या विविध कर्जयोजना राबवाव्यात, असे मी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना आवाहन करून, आपली जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रात एक रोल मॉडेल म्हणून काम करेल. यापुढेही डॉ. तानाजीराव चोरगे यांचे अध्यक्षतेखाली बँकेची दैदीप्यमान वाटचाल सुरू राहील, याबाबत माझ्या मनात यत्कींचीतही शंका नसून, बँकेला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी सदैव बँकेच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन नाम. डॉ. उदय सामंत यांनी केले. त्यानंतर समारोपाचेवेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले,
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 15-02-2025














