खेड : खाडीपट्ट्यात दरवळतोय पावट्याचा सुगंध

खेड : खेड तालुक्याच्या खाडीपट्ट्यात पावट्याच्या फुलांचा सुंगध दरवळू लागला आहे. यंदा रब्बी हंगामात चांगली थंडी असल्यामुळे पावट्यासह अन्य कडधान्य पिकातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.

खेड तालुक्यात सुसेरी, खारी, नांदगाव, बहीरवली, चिंचघर, चाकाळे, मुरडे, आंबये सह आजूबाजूच्या पंचक्रोशीत भातपिक घेतल्यानंतर तत्काळ रब्बी हंगामाची तयारी सुरू होते. शेतात नांगरुन किंवा टोकण पद्धतीने विवीध कडधान्यांची पेरणी केली जाते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत थंडीच्या मोसमात पडणाऱ्या दवबिंदूचे शिंपण या पिकाला मिळाले की पावट्याला आणखी चांगला जोम येतो.

चांगली थंडी पडल्याने खाडीपट्ट्यातून पावट्याची शेती चांगली बहरली आहे. काही शेतामध्ये पावट्यावर फुले ही बहरली असून पावट्याच्या शेंगांचा सुगंध दरवळत आहे. दरवर्षी भातपीक घेतल्यानंतर येथील शेतकरी कडधान्य शेतीतून उत्पन्न घेतात. हे कडधान्य नंतर बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवले जाते. स्थानिक जे पावट्याचे पिक घेतात त्या गावठी पावट्याला मोठी मागणी असते. जानेवारीच्या अखेरीस पावट्याच्या शेतात मोंगा (पोपटी) पार्ट्या होतात. या पावट्याला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

यंदा कोकणात भात हे जरी मुख्य पीक असले तरी लहरी हवामान आणि दर वाढल्याने भातशेती तोट्याचा व्यवसाय झाला आहे. मात्र चांगली दक्षता घेतल्यास पावट्यासह अन्य कडधान्यांमधून भातपेक्षा दुप्पट उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही शेती फायद्याची ठरत आहे. – नानू कंचावडे, शेतकरी, सुसेरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 17/Feb/2025