रत्नागिरी : देवरूख येथे झालेल्या सप्तलिंगी नदी परिषदेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
नदी म्हणजे संस्कृती, नदी संवर्धन हा जगण्याचा, संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे.
नदीला आईचे रूप मानतात; मात्र आपल्या गावातून वाहणाऱ्या नदीची म्हणजे आपल्या आईची दुर्दशा आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. या प्रश्नाकडे समाजाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवरूख येथे पंचायत समितीच्या कार्यालयातील सभागृहात सप्तलिंगी नदी परिषद पार पडली. देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर आणि संगमेश्वर तालुका अॅग्रोस्टार फॉर्मफ्रेश प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे विलास शेलार यांच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील १८ गावांमधील सुमारे ८० हून अधिक नागरिक या परिषदेला उपस्थित होते.
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात आटतात. काही गावांना एप्रिल, मे महिन्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. कोकणात सर्वांत जास्त पाऊस पडूनही पावसाचे पाणी अडविण्याचेी आणि जिरविण्याची कोणतीच यंत्रणा नाही. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारख्या शासकीय योजना असूनही पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी नदी, पऱ्यामार्फत शेवटी समुद्रात वाहून जाते. दरवर्षी कोकणात सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस पजतो. तेवढे पाणी जमिनीत मुरवण्याचे प्रयत्न गावागावात राहणाऱ्यांनी केले पाहिजे. सगळे सरकार करील या भरवशावर तो अजूनही अवलंबून आहे. स्वतः किंवा वाडी, गावाच्या सामूहिक प्रयत्नाने तो पाणी अडविण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले पाहिजे. पावसाळ्यात प्रत्येक घराच्या छपरावरून अडीच ते तीन लाख लिटर पाणी वाहून जाते. सप्तलिंगी नदीकिनारी असलेल्या १८ गावांतील प्रत्येकी शंभर घरांनी म्हणजे किमान १ हजार ८०० घरातील लोकांनी छपरावर पडणारे पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचे प्रयत्न केले, तरी दरवर्षी ५०० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी जमिनीत साठवले जाईल, अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
भूगर्भातील पाणीसाठे हळूहळू कमी होत चालले आहेत, असे जगभरचे शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी लोक सांगत आहेत. त्यामुळे आम्हाला पाणी मिळते ना मग इतरांची गरज मी का बघू, ही भूमिका आता सोडून दिली पाहिजे. जमिनीच्या सातबारावर जसे आपले नाव असते, तसेच भूगर्भातील पाण्याच्या सातबारावर आपण लक्ष द्यायला हवे, अशी सूचना करण्यात आली.
नदी नैसर्गिकरीत्या प्रवाही ठेवायला हवी, केवळ एका गावातील गाळ काढून नदी स्वच्छ होणार नाही. उगमापासून शेवटपर्यंत एकाच वेळी नदीतील गाळ काढून छोटे छोटे बंधारे घातले पाहिजेत. शेती करण्यासाठी आपण जमीन नांगरतो तशी नदी नांगरली पाहिजे. गाळाने बुजलेले झरे नदी नांगरून मोकळे केले पाहिजेत. नदीकिनारी झाडे लावली पाहिजेत. इंग्लंड, युरोपमध्ये नदीची खूप चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते. पर्यटन उद्योग म्हणून नदीकडे पाहिले जाते. युरोपमधील अनेक देश आणि अनेक शहरांत किंबहुना भारतातील गोवा, केरळ ही राज्ये पर्यटनावर उभी आहेत. एक नदी गावाचे अर्थकारण आणि संस्कृती बदलून टाकते. दोन वर्षांपूर्वी चिपळूणकरांनी वाशिष्ठी नदीचा रुद्र अवतार पाहिलेला आहे, असेही मुद्दे मांडण्यात आले.
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हरपुडे गावात सप्तलिंगी नदीचा उगम होतो. हरपुडे, तळवडे आणि हातीवमधले ओढे एकत्र होऊन नदी बनते. पुढे हिचा विस्तार होत ही नदी मुरादपूर, देवरूख, पाटगाव, साडवली, पूर, कुडवली, धामापूर, ताम्हाणे, सांगवे, फणसट, आंबवली, घोडवली, चांदिवणे, तळेकांटे मार्गाने मुंबई- गोवा महामार्गालगत वांद्री गावात पोहोचते. या १८ गावांतील प्रवास संपवून ती शेवटी बावनदीला मिळते आणि तेथून तिचा प्रवास समुद्राच्या दिशेने होतो.
हरपुडे गावातील उगमापासून ते वांद्री गावाच्या शेवटापर्यंत या नदीचा ३३ किलोमीटरचा प्रवास होतो. या प्रवासात १८ गावांतील सप्तलिंगी नदीवर मार्लेश्वर, वाडेश्वर, निळकंठेश्वर, आकार वाकोबा, काशीविश्वेश्वर, दुबळेश्वर, रामेश्वर, सांब, सोमेश्वरची दोन ठिकाणे, चंद्रेश्वर, हरिहरेश्वर अशा या अठरा गावांत बारा शिवलिंगे आहेत, असे निखिल कोळवणकर यांनी सांगितले.
नदी संवर्धनाची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आता या गावातील लोकांची आहे. त्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कार्यक्रम आखले पाहिजे. शासनाच्या जिल्हा जलसंपदा विभागामध्ये सप्तलिंगी नदीला नदी म्हणून मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. त्यानंतर या नदीचा आराखडा आणि नोटीफिकेशन करावे लागेल. संबंधित गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या सभा घ्याव्या लागतील. गावातील कुणा एक दोघांवर तशी जबाबदारी द्यावी लागेल. संपूर्ण ३३ किलोमीटरची शक्य नसेल, तर किमान आपल्या आणि शेजारच्या गावातून जाणाऱ्या नदीची परिक्रमा केली पाहिजे. त्यातून नदीच्या किनारी वसलेल्या गावची संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला पोहोचवता येईल. नदीला घेऊन छोटे छोटे इव्हेंट करावे लागतील. नदीकिनारी जमिनीची धूप थांबणारी झाडे लावावी लागतील. छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडविले पाहिजे आणि त्या पाण्यावर शेती पूरक उद्योग सुरू केले पाहिजे, असे काही पर्याय चर्चेअंती निश्चित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 19-02-2025














