छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा : अफसाना मुल्ला

गुहागर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असणारे व शून्यातून विश्व निर्माण करणारे राष्ट्रपुरुष होते. त्यांच्या कार्यापासून विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घ्यावी व विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे प्रतिपादन अफसाना मुल्ला यांनी केले.

तालुक्यातील वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते उदय रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर, सोनिया नाटेकर, अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, अर्णवी नाटेकर, संस्कार रोहीलकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्फूर्तीदायक गाणी व पोवाडे सादर केले.

याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहुणे शंकर कोळथरकर, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शिक्षिका अंजली मुद्दमवार यांनी केले. सुषमा गायकवाड यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 20/Feb/2025